सेलू ,पुढारी वृत्तसेवा: शिक्षक हा देशाचे शेवटचे आशास्थान असतो. देशात जे घडते किंवा बिघडते त्याला शिक्षक जबाबदार असतो. त्यामुळे देशाच्या विकासाचा व्यापक विचार करणारी पिढी हवी. देशासाठी प्रामाणिकपणे काम करणारे नागरिक शिक्षकांनी घडावावेत. असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे ( कोल्हापूर ) यांनी केले.
शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्यावतीने नूतन विद्यालयाच्या रा. ब. गिल्डा सभागृहात सोमवार (दि. १४) रोजी अक्षर व्याख्यानमालेचे चौथे पुष्प प्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी ' आम्ही भारताचे नागरिक ' या विषयावर गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुख्याध्यापक सर्जेराव लहाने हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य नितीन लोहट ( परभणी ) यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले की, ' कित्येक मराठी शाळा बंद पडत आहेत. अशा मराठी शाळा बंद होणार असतील तर मराठी भाषा बोलणारे नागरिक कसे घडतील. भारतीय असणे म्हणजे भारतीय परंपरा, मुल्य, भारत माहिती असणे आहे. शिक्षकांनी अंर्तमुख होणे आवश्यक आहे. कायदा प्रमाण मानणारे, राष्ट्राचे भविष्य घडवणारे नागरिक असले पाहिजेत. शिक्षक देशाचे चारित्र्य घडवतो. त्यामुळे शिक्षकांची आचारसंहिता महत्त्वाची आहे. अक्षर भारतीय नागरिक व्हावेत. ' असेही ते म्हणाले.
कार्यक्रमास शब्दसह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, कार्याध्यक्ष अरूण चव्हाळ, विलास पानखडे, मुख्याध्यापक संतोष पाटील, चंद्रशेखर मुळावेकर, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, माधव गव्हाणे, बाळू बुधवंत यांची उपस्थिती होती. व्याख्यानास शहरातील श्रोत्यांसह परभणी, जिंतूर, डासाळा येथील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी करून दिला. प्रास्ताविक अक्षर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शरद ठाकर यांनी केले. सुत्रसंचलन सुभाष मोहकरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले.