पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकारच्या अन्नपुरवठा खात्याच्या वतीने शहरी व ग्रामीण भागातील अंत्योदय अन्नयोजने अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारक कुटूंब प्रमुखांना गणेशोत्सव काळात आनंदाचा शिधा किट वाटप करण्यात येणार असल्याचे सुतोवाच ऐकण्यात येत होते. मात्र गणेशोत्सव सुरु होवून आता महालक्ष्मी सणाला देखील आनंदाचा शिधाकिट वाटप करण्यात आला नाही.त्यामुळे गोरगरीब शिधापत्रिकाधारकातून सबंधित प्रशासना विरुध्द नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.साखर,रवा,डाळ,खाद्यतेल अशा स्वरुपाचा आनंदाचा शिधा किट वाटप करावयाचा समावेश असलेल्या शंभर रुपये किंमतीत दिला जाणारा शिधा अद्याप दिला गेला नाही.
जिल्हाधिकारी स्तरावरील जिल्हापुरवठा विभागाचा हलगर्जीपणा यावरुन स्पष्ट होतो.पूर्णा येथील तहसिल कार्यालया अंतर्गत असलेल्या पुरवठा विभागाच्या शासकीय गोदामात आनंदाचा शिधा किट जिल्ह्याच्या पुरवठा कक्षातून पाठवलाच नसल्याची माहीती प्राप्त झाली असून यानंतर प्रशासनाच्या सोयीनूसार सदर आनंदाचा शिधा पात्र शिधापत्रिकाधारकांना मिळणार असल्याची माहिती समोर जरी येत असली तरी ऐन गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणाच्या मुहूर्तावर हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला नाही,यावरुन जिल्हापुरवठा विभागाची अनास्था समोर येत आहे.