परभणी

Parbhani Vet Hospital news | चारठाणा पशुवैद्यकीय दवाखाना 'सलाईन'वर; डॉक्टर, सेवकाअभावी १३ गावांतील पशुधनाची हेळसाड

चारठाणा दवाखान्यात साधा पाणी पाजायलाही माणूस उरलेला नाही

पुढारी वृत्तसेवा

चारठाणा: जिथे मुक्या जनावरांना जीवदान मिळायला हवे, तिथेच सध्या उपचारांचा दुष्काळ पाहायला मिळत आहे. चारठाणा येथील 'श्रेणी-१' पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी आणि सेवक ही दोन्ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने परिसरातील १३ गावांतील पशुधनाचा जीव टांगणीला लागला आहे.

नेमकी अडचण काय?

येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. इरफान दानिश यांची पदोन्नती होऊन त्यांची बदली माजलगाव येथे झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप नवीन नियुक्ती न झाल्याने दवाखाना वाऱ्यावर आहे. दवाखान्यातील सेवक चव्हाण यांची बदली अंबरवाडी येथे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यांचा पगार चारठाणा येथून निघतो, मात्र ते काम अंबरवाडीत करतात. यामुळे चारठाणा दवाखान्यात साधा पाणी पाजायलाही माणूस उरलेला नाही.

१३ गावांचा भार, पण सोयींचा अभाव

चारठाणा येथील दवाखान्यावर केवळ स्थानिकच नव्हे, तर परिसरातील तब्बल १३ गावे अवलंबून आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुढील गावांचा समावेश होतो. ब्राह्मणगाव, हलविरा, कान्हा, मोळा, मोहाडी, जांभरून, सायखेडा, शिवाजीवाडी, सावरगाव, सावरगाव तांडा, दगडचोप, पिंपरी खुर्द आणि चारठाणा.

पशुपालकांचा संताप

हजारो रुपये खर्च करून सांभाळलेली जनावरे आजारी पडल्यास त्यांना उपचारासाठी कुठे न्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. लांबून जनावरे उपचारासाठी आणली जातात, मात्र तिथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रिकाम्या हाती परत जावे लागत आहे. "पशुधन विभाग या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का?" असा संतप्त सवाल आता पशुपालक विचारत आहेत. प्रशासनाने या परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन रिक्त पदे भरावीत आणि मुक्या प्राण्यांची होणारी ही दैना थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT