Parbhani news  
परभणी

Parbhani news | रोहित्र जळाल्याने चारठाण्यात 'बत्ती गुल'; महावितरणकडून दुरुस्तीकडे दुर्लक्ष

तातडीने लक्ष देऊन जळालेले रोहित्र आणि केबल बदलून द्यावी, अशी मागणी चारठाणा ग्रामस्थांनी केली आहे

पुढारी वृत्तसेवा

चारठाणा : जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या चारठाणा येथे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील दर्गा परिसरातील रोहित्राचे (DP) कॉईल जळाल्याने गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. एकीकडे 'मार्च एंड'च्या नावाखाली सक्तीने वीज बिल वसुली केली जात असताना, दुसरीकडे सुविधांच्या नावाने मात्र बोंबाबोंब पाहायला मिळत आहे.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, ग्राहकांमध्ये संताप

दर्गा परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याबाबत स्थानिक लाईनमनला विचारणा केली असता, "साहेबांना कळवले असून ते फेलो रिपोर्ट काढत आहेत," अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. केवळ दर्गा परिसरच नव्हे, तर येथील स्मारक डीपीचे केबलही गेल्या आठ दिवसांपासून जळालेले आहे. वीज वितरण कंपनीकडे साधी केबल वायर उपलब्ध नसावी, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत.

सक्तीची वसुली, पण सुविधा शून्य

सध्या मार्च महिना असल्याने वीज वितरण कंपनीकडून थकीत देयकांसाठी ग्राहकांकडे तगादा लावला जात आहे. मात्र, जेव्हा रोहित्रे किंवा केबल जळतात, तेव्हा दुरुस्तीसाठी तत्परता दाखवली जात नाही. "आमची वीज कधी येणार आणि आम्हाला अंधारातून सुटका कधी मिळणार?" असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन जळालेले रोहित्र आणि केबल बदलून द्यावी, अशी मागणी चारठाणा येथील वीज ग्राहकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT