Death of Chakradhar Pachkor from Surwadi
सुरवाडी (ता.पूर्णा) येथील चक्रधर पाचकोर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  Pudhari News Network
परभणी

सुरवाडी येथील चक्रधरची २ महिन्यांपासूनची मृत्यूशी झुंज अपयशी

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: सुरवाडी (ता.पूर्णा) येथील चक्रधर मुंजाजी पाचकोर (वय २२) याचा दोन महिन्यापूर्वी अपघात झाला होता. त्याच्यावर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आणि रविवारी (दि.७) सायंकाळी उपचारा दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

मेंदूला जबर दुखापत होऊन तो बेशुध्द

याबाबत अधिक माहिती अशी की, चक्रधर पाचकोर हा दोन महिन्यापूर्वी रात्री ९ च्या सुमारास मोटारसायकलवरून सुरवाडी येथून दूधाचा कॅन घेऊन पूर्णेकडे येत होता. यावेळी झिरोफाटा रोडवरील ब्रमाळ पुलाजवळ रस्त्यात पडलेल्या रेतीवर त्याची दुचाकी घसरून अपघात झाला होता. त्याच्या डोक्याला मार लागण्याने मेंदूला जबर दुखापत होऊन तो बेशुध्द झाला होता. त्याच्यावर नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. अखेर रविवारी सायंकाळी त्याची उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे सुरवाडीसह परिसरात शोककळा पसरली.

उपचारासाठी पैसे नव्हते, सोशल मीडियावर मदतीचे आवाहन

चक्रधर हा अतिशय मनमिळाऊ होता. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मिळेल ते काम तो करायचा. उसनवारी करुन दोन म्हैशी घेऊन त्यांने दुध व्यवसाय सुरू केला होता. बहिणीच्या पदवी पर्यंतचा शिक्षणाचा खर्च त्यांने केला. त्याच्या उपचारासाठी सुमारे ६ लाख रुपये लागत होते. त्यासाठी गावकऱ्यांनी पैशाची काहीअंशी तजवीज केली. मित्रांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करून पैसे जमवले. परंतु, त्याची मृत्यू झुंज अपयशी ठरली. त्याच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदाय गहिवरुन गेला होता.

SCROLL FOR NEXT