Case finally registered in Somnath Suryavanshi death case; but against unknown person
परभणी, पुढारी वृत्तसेवा : संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणी शहरात उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिस कोठडीत झालेल्या बेदम मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्युप्रकरणी अखेर शुक्रवारी (दि.१) नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल करताना पोलिसांनी चालबाजी केली. एक आरोपी आणि तोही अज्ञात दाखविण्यात आला आहे. या प्रकरणात खंडपीठाने सूर्यवंशीच्या आईच्या तक्रारीनुसार दोषींविरुद्ध गुन्हे नोंदवा असे आदेश दिले होते. मात्र गुन्हा नोंदविताना पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे वगळून अज्ञातावर गुन्हे नोंदविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आही. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात येणार आहे.
१५ डिसेंबर २०२४ रोजी पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याची तक्रार सोमनाथची आई विजयाबाई व्यंकटी सूर्यवंशी यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ४ जुलै रोजी एक आत आठवड्याच्या संबंधिताविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायमूर्ती विभा कंकनवडी, न्यायमूर्ती देशमुख यांच्या पॅनलने दिले होते. दरम्यान, राज्य सरकारने १० जुलै रोजी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने दोषींविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत राज्य सरकारची याचिका फेटाळली होती. अखेर सोमनाथ सूर्यवंशी मृत्युप्रकरणी नवा मोंढा पोलिसांनी २ ऑगस्ट रोजी अज्ञात एका आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे हे करणार आहेत. तपासानंतर आरोपी निश्चित झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
तक्रारीत होती चार पोलिस अधिकाऱ्यांची नावे
१८ डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई व्यंकटी सूर्यवंशी यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीत आपण स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरिक्षक अशोक घोरबांड, मोंढा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरिक्षक शरद मरे, कार्तिकेश्वर तुरनर, सुलोचना गाडेकर यांची नावे तक्रारीत दिली होती, असे विजयाबाई सूर्यवंशी यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.
एफआयआर पाहिल्यानंतर बोलेल
पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला. या बाबत अॅड. प्रकाश आंबेडकर यांची 'पुढारी' प्रतिनिधींनी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एफआयआर पाहिल्यानंतर मी याबाबत बोलेल असे त्यांनी सांगितले.