Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाच्या सोमवारी होणाऱ्या संयुक्त मोजणीला ब्रेक  File Photo
परभणी

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाच्या सोमवारी होणाऱ्या संयुक्त मोजणीला ब्रेक

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची विनंती मुख्यमंत्र्यांकडून मान्य

पुढारी वृत्तसेवा

Break in joint counting of Shaktipeeth Highway to be held on Monday

परभणी, पुढारी वृत्तसेवा : शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेवर तात्पुरता ब्रेक लागला असून, शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करूनच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा संदेश राज्य शासनाने दिला आहे. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकारामुळे सोमवारी (दि.२३) नियोजित संयुक्त मोजणी स्थगित करण्यात आली आहे.

शक्तिपीठ महामार्ग हा राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प मानला जात असला तरी काही व्यक्तींकडून शेतकऱ्यांमध्ये जाणूनबुजून गैरसमज पसरवले जात असल्याची बाब पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. विकास प्रकल्पांविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने परिस्थिती संवेदनशील बनली होती.

यावेळी पालकमंत्री बोर्डीकर यांनी भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याची हमी देत त्यांच्या वाढीव मोबदल्याच्या मागण्या आणि प्रक्रियेबाबतच्या शंका-समस्यांचे निरसन केल्याशिवाय पुढे जाऊ नये, अशी भूमिका मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही शासनाची भूमिका शेतकरीहिताचीच असल्याचे अधोरेखित करत संयुक्त मोजणी स्थगित करण्याचा निर्णय मान्य केला.

त्यामुळे सोमवारी (दि.२३) होणारी संयुक्त मोजणी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील भावना आणि शेतकरी वर्गाचा विश्वास टिकवून ठेवणे शासनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. विकास आणि लोकसहमती यामधील संतुलन राखण्याचा प्रयत्न या निर्णयातून स्पष्ट दिसून येतो. शक्तिपीठ महामार्ग हा केवळ पायाभूत सुविधा प्रकल्प नसून तो ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

मात्र, भूसंपादनासारख्या संवेदनशील प्रक्रियेत लोकसहमतीचा अभाव राहिल्यास राजकीय परिणामही उमटू शकतात. त्यामुळे शासनाने घेतलेला हा संयमी निर्णय शेतकरीहित जपतानाच विकासाची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. शासनाने सध्या मोजणी प्रक्रियेला स्थगिती दिली असून, पुढील काही दिवसांत संवादाच्या माध्यमातून तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना स्थगितीबाबत आवश्यक सूचना दिल्याचे कळविण्यात आले आहे. पुढील कार्यवाही शेतकऱ्यांशी संवाद साधून आणि त्यांना विश्वासात घेऊनच करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT