बोरी: येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रामेश्वर -सोमेश्वर महादेव मंदिराच्या शिखर बांधकामाचे काम गेल्या काही महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. बांधकामासाठी निर्धारित करण्यात आलेली मुदत संपूनही काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन बांधकाम पूर्ण करण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
रामेश्वर-सोमेश्वर महादेव मंदिर हे बोरीसह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. विविध धार्मिक सण, उत्सव तसेच महाशिवरात्रीच्या काळात मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, मंदिराच्या शिखराचे बांधकाम सुरू असल्याने परिसरात बांधकाम साहित्य व इतर अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे मंदिरात येणार्या भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेण्यास अडचणी येत आहेत. मंदिराच्या शिखराचे काम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, निर्धारित कालावधी संपूनही ते अपूर्ण आहे.
कामाची गती अत्यंत संथ असल्याने बांधकाम पूर्ण होण्यास आणखी किती कालावधी लागणार, असा प्रश्न भाविकांतून उपस्थित होत आहे. संबंधित कंत्राटदाराकडून काम वेळेत पूर्ण न झाल्याने भाविकांना होत असलेल्या गैरसोयीची जबाबदारी निश्चित करून कामाला गती देण्याची गरज आहे. शिखर कामामुळे भाविकांना होत असलेल्या गैरसोयीची दखल घेत रामेश्वर-सोमेश्वर देवस्थान संस्थेकडून संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.
कामाची सद्यस्थिती, संथगती व भाविकांना निर्माण झालेल्या अडचणीबाबत संबंधित विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहारातून माहिती दिली. मात्र, पाठपुरावा करूनही कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने देवस्थान संस्था व भाविकांत नाराजी आहे. मंदिर परिसरात सुरू कामामुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला. मंदिरात लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने दर्शनास येतात. त्यामुळे काम सुरू असताना सुरक्षिततेच्या आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
काम लांबत गेल्यास भाविकांना आणखी काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. रामेश्वर- सोमेश्वर महादेव मंदिर शिखराचे रखडलेले काम प्रशासनाने गांभीर्याने घेऊन संबंधित कंत्राटदाराला काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्या. तसेच काम निर्धारित मुदतीत पूर्ण का झाले नाही, याची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांतून होत आहे.
मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतरच भाविकांना पूर्वीप्रमाणे सुरळीत दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी मंदिरस्थळी पाहणी करून कामाचा आढावा घ्यावा व कामाला गती देऊन मंदिर लवकर भाविकांसाठी खुले करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेणार : मंदिराचे शिखर बांधकाम तातडीने पूर्ण करून भाविकांना दर्शनाची सुविधा सुरळीत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात येणार आहे. मंदिराचे काम लवकर पूर्ण होणे आवश्यक असून, भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्या दीपाली चौधरी यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.