परभणी

Bori Parbhani tension | रातोरात संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्याने तणाव; ग्रामस्थांची मोठी गर्दी, पोलिसांचे शांततेचे आवाहन

एका रात्रीत उभारलेल्या पुतळ्याच्या अधिकृततेवर प्रश्नचिन्ह, पोलिस जखमी

पुढारी वृत्तसेवा

बोरी: जिंतूर तालुक्यातील बोरी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा गुरुवारी (दि.१९) रात्रीच्या वेळी विराजमान करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा पुतळा बसविण्यात आल्याचे संबंधित युवकांचे म्हणणे आहे. मात्र, सदर पुतळा अधिकृत की अनधिकृत, याबाबत प्रशासनाने अद्याप स्पष्ट भूमिका घेतली नसल्याचे समजते पण युवकांनी याबाबतचा ग्रामसभेचा ठराव असल्याचे सांगितले आहे.

गावातील काही युवकांनी सांगितले की, या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्यासाठी पूर्वनियोजित जागा निश्चित करण्यात आली असून ग्रामपंचायतीची ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देखील उपलब्ध आहे. त्यामुळेच पुतळा बसविण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, प्रशासनाकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली असून, सर्व बाबींची खातरजमा केल्यानंतरच पुतळ्याच्या अधिकृततेबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पुतळा उभारला जात असल्याची माहिती मिळताच बोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

बेकायदेशीर पुतळा बसविण्यात येत असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी जमावास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.परिस्थिती नियंत्रणा बाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी बेनिवाल व नंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक गुंजाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी,बोरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंगडे यांच्यासह राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या व अतिरिक्त पुढील बंदोबस्त घटनास्थळावर मध्यरात्रीच दाखल झाला होता.

दरम्यान झालेल्या गोंधळात पोलीस जमादार दिलावर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर प्रथम बोरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी गोविंद कोंडीबा कदम (वय ३३, रा. मुडा), आर्यन उमेशराव वाघमारे (वय २३, रा.बोरी), स्वप्नील संजय शिंपले (वय २३, रा.बोरी)

यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संबंधितांना पुढील चौकशीसाठी न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. तसेच, घटनास्थळी झालेल्या व्हिडिओ चित्रीकरण व छायाचित्रांच्या आधारे इतर संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तपासा दरम्यान आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, गावात या घटनेबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून, पुतळा अधिकृत की अनधिकृत याबाबत प्रशासनाचा अंतिम निर्णय काय येतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. घटनेमुळे बोरी परिसरात सध्या पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT