जिंतूर: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) परभणी जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाच्या सचिव पदी जिंतूर येथील आवेस खान पठाण आफ्रिदी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. बोर्डीकर परिवाराचे निष्ठावान आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आवेस भाई पठाण यांना ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भूमरे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
हा महत्वपूर्ण पद नियुक्ती आणि पक्षप्रवेश कार्यक्रम जिंतूर येथील पोद्दार इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान परभणी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मा. श्री. रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांनी भूषवले. तर, परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री ना. सौ. मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला.
यावेळी व्यासपीठावर जिंतूर विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ. पंडित दराडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसादराव बुधवंत, जिंतूर तालुका अध्यक्ष गोविंद थिटे पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मतीन तांबोळी, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष लालु खान पठाण, आणि जिल्हा अल्पसंख्याक सदस्य जमील कुरेशी (पूर्णा) या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात आवेस खान पठाण यांच्या नियुक्तीसोबतच मोठ्या संख्येने जिंतूर तालुक्यातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या पदांवर नियुक्त्यादेखील करण्यात आल्या.
उपस्थितांना संबोधित करताना माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांना आगामी राजकीय वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. त्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागण्याचे आवाहन केले. "या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकवण्याचा ध्यास आणि ध्येय मनात ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला सुरुवात करावी," असे आवाहन बोर्डीकर साहेबांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी, त्यांनी नवनियुक्त पदाधिकारी आणि पक्षांत प्रवेश केलेल्या सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला, ज्याला भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नियुक्तीमुळे अल्पसंख्याक मोर्चाला नवी ऊर्जा मिळणार असून, आगामी निवडणुकांत पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.