Purna Gaur Zilla Parishad Digambar Karhale Patil
पूर्णा : तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व त्याअंतर्गत बारा पंचायत समिती गणांसाठी येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने १६ जानेवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच ग्रामीण राजकारणात हालचालींना वेग आला. १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, या काळात विविध पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार प्रयत्न केले.
मात्र, उमेदवारी वाटपाच्या प्रक्रियेत अनेक प्रस्थापित व अनुभवी नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटले. काही इच्छुकांनी पक्षाने उमेदवारी नाकारताच पर्यायी राजकीय पर्यायांचा शोध घेत दुसऱ्या पक्षांशी संपर्क साधल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात काही जण यशस्वीही ठरले आहेत.
याचे ताजे उदाहरण म्हणजे गौर जिल्हा परिषद गटातील ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सभापती डिगांबर क-हाळे पाटील. मागील काही वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादीकडून सलग काही टर्म जिल्हा परिषद निवडणूक जिंकत सभापतीपदही भूषविले आहे.
यावेळी कुणबी-मराठा ओबीसी आरक्षणातून गौर गटासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी क-हाळे पाटील यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्याच अनुषंगाने २ जानेवारी रोजी आमदार राजेश विटेकर व आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या उपस्थितीत त्यांनी कार्यकर्त्यांचा मोठा संवाद मेळावा घेतला होता. मात्र, ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांची उमेदवारी नाकारत नव्या चेहऱ्याला संधी दिली.
या निर्णयामुळे क-हाळे पाटील राष्ट्रवादी नेतृत्वावर नाराज झाले. उमेदवारी डावलल्याचे स्पष्ट होताच त्यांनी तत्काळ भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधत आपण निवडून येण्याची खात्री दिली. अखेर अवघ्या दोन दिवसांत भाजपकडून गौर जिल्हा परिषद गटाची उमेदवारी मिळवण्यात ते यशस्वी ठरले. तसेच गौर–ध टाकळी पंचायत समिती गणासाठीही त्यांच्या जवळच्या इच्छुकांना भाजपकडून उमेदवारी मिळाली.
या घडामोडींमुळे “राष्ट्रवादीने डावलले आणि भाजपने स्वीकारले” अशी गौर गटातील क-हाळे पाटलांची वेगळीच राजकीय कथा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.