BJP group leader Budhwant's appointment postponed
परभणी, पुढारी वृत्तसेवा परभणी शहर महानगर पालिकेतील भाजपा नगरसेवकांमध्ये असलेला अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असून काही दिवसापूर्वी गटनेते पद मिळविणाऱ्या विश्वजित बुधवंत यांच्या नियुक्तीला विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. एकंदरीत शिस्तीचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या परभणी शहर भाजपातील बेशिस्त चव्हाट्यावर आली आहे.
पाच दिवसापूर्वी भाजपाच्या मनपातील गटनेतेपदी विश्वजित बुधवंत यांची निवड विभागीय आयुक्तांनी केली होती. या निवडीला भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे व तत्कालीन गटनेत्या तिरुमल्ला खिल्लारे यांनी आव्हान दिले होते. भाजपाच्या ११ नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठीशी कुठलीही चर्चा न करता पक्षश्रेष्ठीला आंधारात ठेवून विश्वजित बुधवंत यांची गटनेते पदी निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता.
या प्रस्तावावर विभागीय आयुक्तांनी विश्वजित बुधवंत यांची गटनेते पदी नियुक्तीही केली होती. परंतु ही नियुक्ती काही काळाचीच ठरली असून बुधवंत यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, गटनेत्या तिरुमल्ला खिल्लारे यांची सरसी झाली आहे.
बुधवंत यांच्या निवडीच्या प्रस्तावावर काही नगरसेवकांच्या सह्या आहेत. तर काहींच्या सह्या नाहीत. त्यामुळे प्रस्तावाची वैधता संशयास्पद आहे. निवडीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही, असे भरोसे, खिल्लारे यांनी विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते. त्या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्तांनी बुधवंत यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे.
यामुळे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या विरोधात सक्रिय असलेला भाजपातील नगरसेवकांचा पिछाडीवर गेला आहे. बुधवंत यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाल्यामुळे भाजपाच्या अधिकृत गटनेत्या म्हणून तिरुमल्ला खिल्लारे याच काम पाहणार आहेत. भाजपाच्या अंतर्गत गटबाजीमुळे मनपा प्रशासन मात्र संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.
एकंदरीत परभणी शहरातील भाजपा मधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असून तो थांबायला तयार नाही. शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख असलेल्या परभणी शहर भाजपात मात्र तु... तु-मै... मै सुरू असल्याचे वास्तव आहे.