पूर्णा : तालूक्यातील आव्हई येथील गाव नदीला शुक्रवारी दुपारनंतर अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बुडून दोन दुभत्या म्हशी दगावल्या गेल्या. यात शेतकरी देविदास साहेबराव पवार या शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती असी की, पूर्णा तालूका परिसरात ता.१२ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी १ वाजेनंतर अचानक ढगफुटीसदृष्य मुसळधार पाऊस पडून नदी नाल्यांना मोठा पूर येवून एकच हाहाकार उडाला होता. सर्वच ठिकाणी शेतशिवार व गावा शेजारील ओढे नद्यांना कधी नव्हे तो महाप्रलया प्रमाणे मोठे पूर आले होते. पुराचे पाणी नदीकाठील शिवारात फैलावून त्यात पिकं व गुरेढोरांचे अतोनात नुकसान झाले.
यातच, याच दिवशी आव्हई गावाशेजारील नदीकाठावर शेतकरी देविदास पवार यांनी आपल्या म्हशी पावसा आधी झाडाखाली बांधून ते परभणी येथे एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते.ते गावाकडे वापस येईपर्यंत दुपारनंतर अतिवृष्टी होवून नदीला मोठा पूर आला. या पुराच्या पाण्यात नदीकाठी अखाड्यावर बांधलेल्या म्हशी बुडून अक्षरशः जागेवरच गोच्या खात मृत्युमुखी पडल्या. ही घटना गावात येताच देविदास यांना कळताच ते एकदम परेशान होवून बसले. सदर घटना घडल्यामुळे त्यांचे कुटुंबीय मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत. दरम्यान,१४ सप्टेंबर रविवार रोजी तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी त्यांच्या नुकसानीची माहिती घेतली. शेतकरी देविदास पवार यांनी महसूल प्रशासनाकडे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
दरम्यान,पूर्णा ते झिरोफाटा रोडवर असलेल्या माटेगाव गावाजवळील थुना नदीवर चालू असलेल्या नवीन पुल बांधकामा लगतच्या पर्यायी रस्त्यावरुन तीन दिवसांपासून पाणी वाहत आहे.येथील वाहतूक पुराच्या पाण्यामुळे "चालू होज्या बंद होज्या"या प्रमाणे नेहमीच पाऊस पडताच ठप्प होत आहे. आता तर शुक्रवार पासून पडणा-या मुसळधार पावसाच्या पूरामुळे येथील नदी पुलावरुन पाणी वाहत असून थुना नदीने कधी नव्हे ते धोक्याची पातळी ओलांडली आहे. येथून वाहतूक न करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.