Parbhani Crime News : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ऑटो रिक्षा उलटला file photo
परभणी

Parbhani Crime News : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ऑटो रिक्षा उलटला

माटेगावचे १० ते १५ विद्यार्थी जखमी; चालकाचे नियंत्रण सुटल्याने पूर्णा-झिरोफाटा मार्गावर अपघात

पुढारी वृत्तसेवा

An auto-rickshaw carrying students overturned

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन माटेगावकडे जाणाऱ्या खासगी ऑटो चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. पूर्णा-झिरोफाटा मुख्य मार्गावरील हॉटेलसमोर सोमवारी (दि. २१) दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास अपघात घडला. ऑटो रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन पलटी झाला. यात ऑटोतून प्रवासातील सुमारे १० ते १५ विद्यार्थी-विद्यार्थिनींना दुखापत झाली. जखमी विद्यार्थ्यांवर पूर्णा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तालुक्यातील माटेगाव येथील अनेक विद्यार्थी पूर्णा शहरातील अभिनव तसेच विद्या प्रसारणी शाळेत शिक्षण घेतात. शाळेत ये-जा साठी हे विद्यार्थी खासगी ऑटोचा वापर करतात. सोमवारी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी ऑटो (क्र. एमएच २२ यू ४२६५) मधून माटेगावच्या दिशेने निघाले होते. पूर्णा शहरातून झिरोफाट्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर ऑटो राजमुद्रा हॉटेलसमोर आला असता अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

त्यामुळे ऑटो रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन जोरदार आदळला आणि नंतर रस्त्यावर पलटी झाला. अचानक झालेल्या अपघातामुळे ऑटोतील विद्यार्थ्यांत एकच घबराट उडाली. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात समृद्धी व्यंकटी बोबडे, शिवम जनार्दन श्रीवास, वैभव तानाजी परडे, गायत्री बाबूराव बोबडे, सोनाक्षी मोहन बोबडे, सोनी गणेश बोबडे, वेदिका अरविंद बोबडे यांच्यासह अन्य विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले.

त्यांच्या हात-पायांना, मानेला तसेच शरीराच्या अन्य भागांना मार लागला. नागरिक व नातेवाईकांनी तातडीने जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी पूर्णा येथील रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती माटेगावसह पूर्णा परिसरात पसरताच पालक व नातेवाईक चिंतेत पडले. अनेक पालकांनी तातडीने रुग्णालय गाठले.

रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. आपल्या मुलांना झालेल्या दुखापतीची माहिती घेण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होती. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजल्यानंतर पालकांनी काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला. अपघाताची माहिती मिळताच पोउपनि शिवाजी सिंगनवाड हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने तसेच वाहनांची वर्दळ वाढल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी घटनास्थळी जमा झालेली गर्दी नियंत्रित करून वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त ऑटोची पाहणी करून पोलिसांनी घटनेची माहिती घेतली.

ऑटोत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी होते का ?

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी ऑटोचा अपघात झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. ऑटोत नेमके किती विद्यार्थी होते, वाहनाची क्षमता किती होती, चालकाकडे आवश्यक कागदपत्रे व परवाना होता का, तसेच चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, याची चौकशी होणे अपेक्षित आहे. या अपघाताची चौकशी करून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT