Parbhani News : सोसायटीत ५ कोटी ६० लाखांच्या अपहाराचा आरोप file photo
परभणी

Parbhani News : सोसायटीत ५ कोटी ६० लाखांच्या अपहाराचा आरोप

देवठाणा विविध कार्यकारी सेवा सह. संस्थेतील प्रकार ; मयत, भूमिहीन सभासदांच्या नावे उचलले कर्ज

पुढारी वृत्तसेवा

Allegation of ₹5.60 crore misappropriation in the society

परभणी, पुढारी वृत्तसेवा पूर्णा तालुक्यातील देवठाणा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कारभारावरून खळबळ उडाली आहे. मयत तसेच भूमिहीन सभासदांच्या नावावर कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचलून तब्बल ५ कोटी ६० लाख रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी समिती नियुक्त केली असून, या चौकशीत आरोपांची सत्यता आणि कर्जवाटपातील नियमांची तपासणी केली जाणार आहे.

देवठाणा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या निवेदनानुसार, सन नावावर २०२१ ते २०२६ या कालावधीत संस्थेचे चेअरमन, सचिव तसेच संबंधित बँक कर्मचाऱ्यांनी संगनमत करून नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गावातील तसेच परिसरातील काही भूमिहीन व्यक्तींच्या कथितरीत्या बनावट आधारकार्ड, सातबारा उतारे व अन्य कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावावर लाखो रुपयांची कर्जे उचलण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मयत व्यक्तींच्या नावावरही कर्जाचा आरोपया कथित गैरव्यवहारातील आणखी एक गंभीर आरोप म्हणजे मयत व्यक्तींच्या नावावरही कर्ज उचलण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

त्यामुळे संबंधित सभासद प्रत्यक्षात कर्जासाठी पात्र होते का, कर्ज अर्ज कोणी भरले, कागदपत्रांची पडताळणी कशी झाली आणि कर्जाची रक्कम प्रत्यक्ष कोणाच्या ताब्यात गेली, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संस्थेतील संबंधित कर्जखाती, कर्ज अर्ज, आधारकार्ड, सातबारा उतारे, कर्ज मंजुरीची कागदपत्रे आणि कर्जाच्या रकमेच्या प्रत्यक्ष वापराचा तपशील तपासण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कथित गैरव्यवहारातून झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी राजेंद्र खंदारे, माणिक जोगदंड, धोंडिराम दुधाटे, सरपंच सचिन जोगदंड, उपसरपंच रामप्रसाद जोगदंड, रामप्रभू जोगदंड, बालाजी जोगदंड, रुपेश दुधाटे, बालासाहेब जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

चौकशी समिती नियुक्त

तक्रारीची दखल घेत पूर्णा सहकारी संस्थेचे सहायक निबंधक एस. जी. दराडे यांच्या अध्यक्षतेखाली सहायक निबंधक ए. बी. नांदूरे आणि लेखापरीक्षक एस. के. कटकुरी यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीला ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशीत संबंधित कर्जखाती, अर्ज, आधारकार्ड, सातबारा उतारे, मंजुरीची कागदपत्रे आणि रकमेच्या वितरणाचा तपशील तपासला जाणार आहे.

चौकशीत सर्व स्पष्ट होईल

दरम्यान, देवठाणा संस्थेचे चेअरमन अंकुश जोगदंड यांनी ग्रामस्थांचे आरोप फेटाळले आहेत. काही लोकांनी चुकीचे व बिनबुडाचे आरोप करून तक्रार केली असून, चौकशीत आम्ही आमची बाजू मांडू. समितीच्या अहवालानंतरच सत्यता स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT