कृषी तपस्वी दादा लाड यांना पद्मश्री जाहीर File Photo
परभणी

कृषी तपस्वी दादा लाड यांना पद्मश्री जाहीर

परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा; कापूस उत्पादन वाढीचे 'लाड तंत्र' देशभर गाजले

पुढारी वृत्तसेवा

Agricultural Dada Lad awarded Padma Shri

परभणी, पुढारी वृत्तसेवा : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला परभणीकरांसाठी एक अभिमानास्पद बातमी धडकली. परभणी तालुक्यातील माळसोत्रा येथील भूमिपुत्र आणि प्रयोगशील शेतकरी श्रीरंग उर्फ दादा लाड यांना कृषी क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारने देशातील प्रतिष्ठेचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर केला आहे. या घोषणेमुळे कृषी क्षेत्रात आनंद व्यक्त होत असून, दादा लाड यांचे मूळ गाव असलेल्या माळसोन्ना आणि दैठणा पंचक्रोशीत ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.

दादा लाड यांचा जन्म १ जानेवारी १९४७ रोजी माळसोन्ना येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांचा ओढा शेतीकडे होता. पारंपरिक शेती करत असताना त्यांनी कापूस पिकातील बदलत्या प्रवाहांचे बारकाईने निरीक्षण केले. देशी कपाशीपासून ते बीटी कापसापर्यंतचा प्रवास त्यांनी अनुभवला. बीटी बियाणे आल्यानंतर उत्पादन खर्च वाढला, पण त्या तुलनेत उत्पन्न घटत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर उपाय शोधण्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात प्रयोग सुरू केले.

लाल कंधारी आणि विद्यापीठाचा गौरव

केवळ कापूसच नव्हे, तर पशुधनासाठीही त्यांनी मोठे काम केले आहे. देशी गाईचे महत्त्व ओळखून त्यांनी मराठवाड्यातील 'लाल कंधारी' गाईच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या कृषी क्षेत्रातील तपश्चर्येची दखल घेत नुकतेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन सन्मानित केले होते, आता केंद्र सरकारने त्यांना 'पद्मश्री' जाहीर करून त्यांच्या कार्यावर मोहोर उमटवली आहे.

काय आहे दादा लाड यांचे संशोधन ?

शेतकऱ्यांना कपाशीतून भरघोस आर्थिक नफा मिळावा, यासाठी दादा लाड यांनी कापूस पिकाची गळफांदी छाटणी करण्याची अभिनव पद्धत विकसित केली. यामुळे पिकाची अनावश्यक वाढ थांबून बोंडांचे वजन आणि संख्या वाढते, असे त्यांनी सिद्ध केले. २०२४ मध्ये झालेल्या ५२ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या (अॅग्रेस्को) बैठकीत या तंत्रज्ञानाला अधिकृत मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे, आज देशातील ८ राज्यांनी हे तंत्रज्ञान स्वीकारले असून लाखो शेतकरी याचा लाभ घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT