पूर्णा,पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले सफाई, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, करवसूली, व लिपीक कामगार पदावर काम करणा-या कर्मचाऱ्यांनी चार दिवस कामबंद आंदोलन पुकारले आहे. वेतनश्रेणीच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन पूर्णाच्या वतीने आज (दि.२३) या मागणीचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयुरकुमार आंदेलवाड यांना देण्यात आले. २६ ते २९ फेब्रुवारी दरम्यान चार दिवस या कर्मचाऱ्यांचे आंदोलन असणार आहे.
राज्यातील २७९२० ग्रामपंचायत मध्य सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार, वीजपुरवठा कामगार, करवसूली कर्मचारी लिपीक या पदावर काम करीत असलेले सुमारे ६० हजार कामगार कमी वेतनात काम करीत आहेत. कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न ब-याच वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत ग्रामपंचायत कर्मचा-यांनी बरेचदा आंदोलन, मेळावे, मोर्चे अधिवेशने केली आहेत. मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, कामगार मंत्री यासह ब-याच आमदारांनी आंदोलन मोर्चात उपस्थिती देवून आश्वासन दिले होते. त्यानंतर प्रशासकीय बैठकाही झाल्या मात्र अद्यापही वेतनश्रेणीचा निर्णय घेतला नाही.
या कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी, निवृत्तीवेतन लागू करावे, वेतन अनुदानासाठी लादलेली वसूलीची अट पूर्णत रद्द करावी, सुधारीत किमान वेतनातील १० आगस्ट २०२० पासून मार्च २०२२ पर्यंत थकित असलेली फरकाची रक्कम तात्काळ अदा करावी, असे निवेदन ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे डिंगाबर गिरी, उपाध्यक्ष भिमराव गायकवाड, सचिव जगन्नाथ साखरे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिले.
हेही वाचा :