Parbhani News : क्लायमेट रेसिलियंट शेतीचा अवलंब करा : कुलगूरू इंद्र मणी file photo
परभणी

Parbhani News : क्लायमेट रेसिलियंट शेतीचा अवलंब करा : कुलगूरू इंद्र मणी

बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी हवामान अनुकूल (क्लायमेट रेसिलियंट) शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन टिकविण्यावर भर द्यावा, असे वनामकृविचे कुलगुरू प्रा.डॉ. इंद्र मणी म्हणाले.

पुढारी वृत्तसेवा

Adopt climate-resilient farming: Vice-Chancellor Indra Mani

परभणी, पुढारी वृत्तसेवा : हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप दिवसेंदिवस अधिक अनिश्चित होत असून, अल्पावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाचा खंड अशी परिस्थिती वारंवार निर्माण होत आहे. या बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी हवामान अनुकूल (क्लायमेट रेसिलियंट) शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन टिकविण्यावर भर द्यावा, असे वनामकृविचे कुलगुरू प्रा.डॉ. इंद्र मणी म्हणाले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, अंतर्गत कार्यरत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प येथे सुरू विविध संशोधन प्रयोगांची शनिवारी पाहणी करून त्यांनी शास्त्रज्ञांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रभारी अधिकारी व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, प्रकल्पावरील शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.

संशोधन प्लॉटची पाहणी करताना कुलगुरूंनी विविध पिकांवरील प्रयोग, हवामान बदलाशी सुसंगत शेती तंत्रज्ञान, मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजनासह खरीप पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास योग्य व्यवस्थापनाद्वारे पिकांवरील ओलाव्याचा ताण कमी करून उत्पादनातील घट टाळता येते, असे सांगितले.

शेतकऱ्यांनी वेळेत कोळपणी व निंदणी करून जमिनीतील भेगा बुजवाव्यात. त्यामुळे जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकतो, तणांचे नियंत्रण होते, मुळांची वाढ सुधारते आणि अन्नद्रव्यांचे शोषण वाढते. तसेच कोळपणीनंतर तयार होणारा मातीचा बारीक थर बाष्पीभवन कमी करण्यास मदत करतो, असे स्पष्ट केले.

पावसाच्या खंड काळात पिकांवरील ताण कमी करण्यासाठी एक टक्का पोटॅशियम नायट्रेट (केएनओ3) फवारणी करण्याचा सल्ला देत यामुळे पिकांची ताण सहन करण्याची क्षमता वाढते, पाने अधिक काळ हिरवी राहतात, प्रकाशसंश्लेषण सुरळीत राहते आणि उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होते. ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, विहीर किंवा अन्य जलस्रोत उपलब्ध आहेत, त्यांनी पावसाच्या खंड काळात संरक्षित सिंचनाचा अवलंब करावा.

ठिबक व तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींमुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होतो. तसेच जलसंधारण सरी उघडणे, पावसाचे पाणी शेतात मुरविणे आणि ओलावा संवर्धनाच्या उपाययोजना प्रभावी राबविणे आवश्यक असल्याचे सांगितले. अद्याप पेरणी न झालेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.

१५ ते २० जुलैपर्यंत पेरणी झाल्यास कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी व सूर्यफूल ही पिके घेता येतील. त्यानंतर पाऊस उशिरा झाल्यास तूर, बाजरी, सूर्यफूल, एरंडी, कारळ व तीळ या दुष्काळसहिष्णू पिकांना प्राधान्य द्यावे, असा सल्ला दिला. डॉ. गोरे यांनी प्रकल्पात सुरू विविध संशोधन उपक्रमांची, हवामान बदलाशी संबंधित संशोधनाची व पावसाच्या खंड काळात पिकांचे संरक्षणासाठी विकसित तंत्रज्ञानाची माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT