TET paper leak : टीईटी पेपरफुटी विरोधात अभाविपचे परभणीत निदर्शने file photo
परभणी

TET paper leak : टीईटी पेपरफुटी विरोधात अभाविपचे परभणीत निदर्शने

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) परभणी महानगराच्या वतीने शनिवारी श्री शिवाजी महाविद्यालयासमोर आंदोलन करून निदर्शने करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

ABVP protests in Parbhani against the TET paper leak

परभणी, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीच्या संशयित प्रकरणामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असताना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) परभणी महानगराच्या वतीने शनिवारी श्री शिवाजी महाविद्यालयासमोर आंदोलन करून निदर्शने करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी रॅकेटचा निषेध करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दोषींना कठोर शिक्षा, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आणि राज्यातील परीक्षा व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करण्याची मागणी यावेळी केली.

आंदोलना दरम्यान पेपरफुटीला संरक्षण देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, टीईटी पेपरफुटीची उच्चस्तरीय चौकशी करा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाल्याने शासना विरोधातील संताप स्पष्ट दिसला. अभाविपच्या महानगर मंत्री गायत्री लाड यांनी सांगितले की, शिक्षक पात्रता परीक्षेच्या संभाव्य पेपरफुटीमुळे परीक्षा पुढे ढकलावी लागणे हे राज्याच्या परीक्षा व्यवस्थेच्या अपयशाचे गंभीर उदाहरण आहे.

लाखो विद्यार्थी अनेक महिने प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेची तयारी करत असताना त्यांच्या कष्टांवर पाणी फेरणाऱ्या दोषींना कठोर फौजदारी शिक्षा झालीच पाहिजे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींना कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले की, काही वर्षात महाराष्ट्रासह देशभरातील विविध भरती, प्रवेश आणि पात्रता परीक्षांमध्ये वारंवार पेपरफुटी व गैरप्रकार उघडकीस येत आहेत.

परिणामी विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाला. प्रत्येक घटनेनंतर चौकशीची घोषणा केली जाते, मात्र प्रत्यक्षात अशा घटना थांबत नसल्याने शासनाची परीक्षा सुरक्षा व्यवस्था प्रभावी नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अभाविपचे देवगिरी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे यांनी सांगितले की, राज्यात पुन्हा एकदा पेपरफुटीची घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी असून शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्न निर्माण करणारे आहे.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित परीक्षा या राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेचा कणा आहेत. त्यामध्येच गैरप्रकार होत असतील तर शासन आणि संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी केवळ आश्वासने देऊन चालणार नाही, तर ठोस, परिणामकारक आणि दीर्घकालीन उपाययोजना तातडीने राबविणे आवश्यक आहे.

परीक्षा प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल ट्रॅकिंग, मजबूत सायबर सुरक्षा, उत्तरदायित्व निश्चित करणारी स्वतंत्र यंत्रणा आणि पारदर्शक देखरेख प्रणाली तातडीने लागू करण्याची मागणी केली. केवळ दोषींना अटक करून प्रश्न सुटणार नसून भविष्यात अशा घटना कायमस्वरूपी रोखण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत व्यापक आणि आमूलाग्र बदल करणे गरजेचे असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी टीईटी पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करावी, पेपरफुटी रॅकेटमधील सर्व दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून परीक्षेची नवीन तारीख तातडीने जाहीर करावी, विद्यार्थ्यांवरील आर्थिक व मानसिक ताण कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात तसेच राज्यातील सर्व स्पर्धा व पात्रता परीक्षांसाठी तंत्रज्ञानाधारित, सुरक्षित व पारदर्शक परीक्षा व्यवस्थापन प्रणाली तातडीने लागू करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात अभाविपचे देवगिरी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे, महानगर मंत्री गायत्री लाड, जिल्हा संयोजक दर्शन देशमुख, महानगर सहमंत्री ऋषिकेश झाडे, जिल्हा विद्यार्थीनी प्रमुख अमरजा नारवडकर, विद्यार्थी सहभागी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT