ताडकळस : पुढारी वृत्तसेवा
ताडकळस येथुन जवळच असलेल्या महागाव ता. पुर्णा येथील एका (२५ वर्षे) वयाच्या युवकाने अज्ञात कारणाने शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून जीवन संपवले. ही घटना दि १५ फेब्रुवारी रोजी (शनिवार) रोजी सकाळी १०. वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, महागाव ता. पुर्णा येथील गोविंद मारोतराव रोडगे (वय २५ वर्षे) या तरुणाने महागाव शिवारातील शेत गट नंबर २२० महादु गंगाराम रोडगे यांच्या शेतात अज्ञात कारणाने बाभळीच्या झाडाला गळफास लावून जीवन संपवले. या बाबातची माहिती मृताचा चुलत भाऊ बालाजी गंगाधर रोडगे (वय ३१ वर्षे) रा. महागाव ता. पुर्णा यांच्या माहितीवरुन ताडकळस पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल पोते यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात बालाजी गंगाधर रोडगे यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल पोते हे करीत आहेत.