परभणी : १२ तांड्यांसाठी ९० लाखांचा निधी; तांडावस्ती सुधार योजना file photo
परभणी

परभणी : १२ तांड्यांसाठी ९० लाखांचा निधी; तांडावस्ती सुधार योजना

परभणी : १२ तांड्यांसाठी ९० लाखांचा निधी; तांडावस्ती सुधार योजना

पुढारी वृत्तसेवा

परभणी, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत २०२४-२५ करिता परभणी, पालम, सोनपेठ, पुर्णा व पाथरी तालुक्यातील तांडा वस्तीतील १२ कामांसाठी ९० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निर्णय शासनाने दि.३ ऑक्टोबर रोजी घेवून प्रशासकीय मान्यता दिली आहे.

राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत दि. ३ ऑक्टोबरला शासन निर्णयातून विकासकामांना प्रशासकीय मान्यता व निधी वितरीत केला. योजनेंतर्गत राज्यात भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्गात अनेक जाती, जमाती अजून त्या आजही भटकंती करून स्थलांतरित स्वरूपाचे जीवन जगत आहेत. लमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी अशा अनेक समूहाचे तांडे व वस्त्या कार्यरत आहेत. अशा प्रकारच्या तांड्यांमध्ये या जाती, जमातीतील नागरिक अनेक वर्षांपासून वास्तव्य करत असले तरी अशा तांडे व वस्त्यांना प्राथमिक सुविधा अजूनही उपलब्ध झालेल्या नाहीत. यातच आधुनिकतेकडे कल असला तरी बहुसंख्य समाज गरिबीचे जीवन जगत आहे.

यामुळे तांडे, वाडी किंवा वस्त्यांत या समाजाला स्थिर जीवन जगता यावे यासाठी तेथील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सदर योजनेंतर्गत निधीची तरतूद उपलब्ध करून दिली आहे. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत २०२४-२५ करिता वसंतराव नाईक तांडा, वस्ती सुधार योजना जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत मान्यता मिळालेल्या कामांच्या शिफारशीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. याच योजनेंतर्गत राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अवर सचिव म.वा.सारंग, उप सचिव दिनेश चव्हाण यांच्या स्वाक्षरीने गुरूवारी ही मंजूरी देण्यात आली. यातूनच परभणी, पालम, सोनपेठ, पुर्णा व पाथरी तालुक्यातील ६ ग्रामपंचायती अंतर्गतच्या १२ तांडा व वस्तींसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तांडावस्तींना मिळालेला निधी

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत २०२४-२५ साठी विकासकामांकरिता निधीची मंजूरी मिळाली. यात परभणी तालुक्यातील टाकळी कुं.ग्रा.पं. अंतर्गत आहिल्याबाई होळकर नगर, पारधी तांडा, वैद्यनगर, काचगुंडे नगर, गाढवे नगर येथे प्रत्येकी ५ लाख, पोटेकर नगराकरिता १५ लाख, पालम तालुक्यातील लांडकवाडी ग्रा. पं. अंतर्गत आहिल्यादेवी नगर, महादेववाडी ग्रा.पं. अंतर्गत रेखा तांडा, सोनपेठ तालुक्यातील देवीनगर ग्रा. पं. अंतर्गत देवीनगर तांडा येथे प्रत्येकी १० लाख, पुर्णा तालुक्यातील ताडकळस ग्रा. पं. अंतर्गत आहिल्यादेवी होळकर नगरातील दोन कामांसाठी १२ लाख ५० हजार, पाथरी तालुक्यातील कासापूरी ग्रा. पं. अंतर्गत धनगर वस्तीतील कामांसाठी ७ लाख ५० हजारांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून विद्युतीकरण, सीसीरोड व नाली, भुमिगत नाली अशी होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT