रहस्यमयी १२ खून कसे झाले, यावर 'मानवत मर्डर्स' नावाची सीरीज येत आहे file photo
परभणी

एकाच गावातील १२ खूनांचे सस्पेन्स, असा लागला 'मानवत'च्या हत्याकांडाचा छडा

पुढारी वृत्तसेवा
शरद देऊळगावकर (लेखक ज्येष्ठ पत्रकार असून मानवत खून प्रकरण त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून उजेडात आणले, त्याचा पाठपुरावा केला. तसेच या खून खटल्यावर आधारित ' मानवत हत्याकांड' हे पुस्तकही लिहिले)

एकाच गावात घडलेल्या १२ जणांच्या खुनाचा छडा अखेर कसा लागला..दीड वर्षांत अनेकांचे बळी गेलेले..अनेक संशयित या खुनाच्या प्रकरणात होते...पण पुरावे गोळा करणे आणि रहस्यमयी खुनाचा तपास करणे हे तपास अधिकाऱ्यांसाठी आव्हान होते. १९७२ सालचं देशाला हादरवणारं ‘मानवत हत्याकांड’आणि आरोपींच्या शोधात, डीसीपी रमाकांत कुलकर्णी! सत्य घटनेवर आधारित कहाणी, 'मानवत मर्डर्स' वेब सीरीज येतेय. पण, या मानवत खुनामागील कहाणी किती थरारक आणि संपूर्ण देशाला हादरवणारी होती..वाचा शेवटपर्यंत..

काय हो! आम्ही मानवतबद्दल जे ऐकलं ते खरं आहे का? तिथे म्हणे....गुप्तधनासाठी आणि संतती प्राप्तीसाठी काही जणांचे बळी दिले गेले? त्या परिसरातले नागरिक खूप घाबरले होते...संध्याकाळी म्हणे घराच्या बाहेर पडत नव्हते....रात्रीच्या वेळी कोणी तरी जटाधारी, दाढीधारी 'धऱ्या बुवा' गावात संचार करतो.. पकडतो... अन् मारून, त्याचा बळी दिला जातो... गावात कोणी पाहुणा रावळा येत नाही.... मानवतला येण्यासाठी लोक घाबरतात... एक दीड वर्ष असं दहशतीचे वातावरण मानवत आणि त्याच्या परिसरात होतं..

खरंच असं होतं..? असे प्रश्न अनेकांच्या मनात अजूनही येतात. कांही जण स्पष्ट विचारतात. अन् नाईलाजाने त्या प्रश्नाला उत्तर द्यावं लागतं...हो, असं घडलं होतं .. मानवत गावात.... मात्र आता नाही... ५० वर्षांपूर्वी.

कसे घडत गेले मानवत हत्याकांड ?

१४ नोव्हेंबर १९७२ ते ४ जानेवारी १९७४ या ४१७ दिवसांत मानवत परिसरात गुप्तधन आणि संततीप्राप्ती या दुहेरी हेतूसाठी सात मुली, चार महिला असे ११ आणि एक दहा वर्षांचा मुलगा असे एकूण बारा जणांचे खून झाले होते. ज्याला लोक नरबळी समजू लागले. हे प्रकरण 'मानवत हत्याकांड' म्हणून देशभर गाजले होते.

मानवत....परभणी या जिल्हा ठिकाणापासून ३६ कि.मी. अंतरावरील धड खेडे ना शहर असे नगरपालिका असलेले एक गाव. कापड व्यापारासाठी प्रसिद्ध. पन्नास वर्षांपूर्वी तेथील लोकसंख्या सुमारे १५ / २० हजारांच्या जवळपास असावी. बंगाली जादूटोणा, भूतखेत, करणी, आसरा, भानामती यावर विश्वास ठेवणारी काही मंडळी त्या काळात होती. मुंजा पिंपळ पुजले जात होते. त्यांना प्रसन्न करून मनोवांछित पूर्ण करून घेणे ही रूढी त्या काळात समाजाला मान्य होती. मांत्रिक, देवऋषी यांच्या भविष्य कथनावर भरवसा असणारे काहीजण होते. अशा अंधश्रद्धा अनुकूल वातावरणात मानवतच्या परिसरातील एका गावी वस्तीला आला एक वैदू (देवऋषी / मांत्रिक). नाव त्याचं गणपत साळवे. वय सुमारे ६० वर्षे. तो रोगावर औषधपाणी सांगायचा..मूलबाळ होत नसेल त्यांना शकून पाहून उपाय सांगायचा.. काही दिवसांतच त्याची प्रसिद्धी मानवतपर्यंत पोहोचली. त्याला कोणाहाती निरोप मिळाला की तुला मानवतमध्ये या ठिकाणी घरी बोलावलं आहे. गणपत वैदू तिथे गेला. ते घर होते रुक्मिणीचे. तिची ओळख शहरातील एक मातब्बर व्यक्ती.. माजी नगराध्यक्ष उत्तमराव बारहाते यांनी ठेवलेली अशी....मानवतच्या भरवस्तीतला जुनाट वाडा. वाड्यात पिंपळाचा मोठा वृक्ष.. अन् त्याच्या बुडाशी मुंजा. शेंदूर लावलेला.

गणपत वैदू तेथे गेला. रुक्मिणीने आपली पोटदुखीची व्यथा सांगितली...तो म्हणाला..आसरा (जलदेवता ) चा कोप आहे.. म्हणून मूलबाळ होत नाही त्यावर उपाय म्हणून त्याने मंत्रतंत्र गंडा दोरी दिली. अन् शकून पाहून आणखी काय करावयाचे ते सांगतो म्हणाला... अन् जाता जाता त्याचे लक्ष पिंपळ आणि मुंजाकडे गेले. अन् सहज बोलून ला...याखाली (पिंपळाखाली) गुप्तधन आहे. पिंपळाखालील गुप्तधन काढायचे असेल तर मुंजाला प्रसन्न केले पाहिजे..त्यासाठी देवाला शकून ( कौल) पहावा लागेल. काही दिवसांनंतर शकून पाहिला. संततीप्राप्ती आणि गुप्तधन या दोन्ही हेतूसाठी एकच शकून निघाला... मुंज्याला कुमारिकेचे रक्त पाहिजे ...गुप्तांगाचे. अन् येथून मानवत हत्याकांडाची खून सत्राची मालिका सुरू झाली.

१४ नोव्हेंबर १९७२. दुपारच्या सुमारास गवऱ्या वेचण्यासाठी रानात गेलेली कु. गया सखाराम कच्छवे (१०) गायब झाली. घरच्या मंडळींनी खूप शोधले. पण, शोधले. पण सापडली नाही. दोन दिवस उलटल्यावर तिसरे दिवशी १७ नोव्हेंबरला तिचे प्रेत सापडले. उत्तमराव बारहाते यांच्या शेतालगत असलेल्या एका ओढ्यात. तिच्या डोक्यावर दोन मोठ्या जखमा आणि गुप्तांगावर जखम. पोलिस डायरीत नोंद अकस्मात मृत्यू. ९ डिसेंबर १९७२ कु. शकिला अल्लाउद्दिन (९) सरपण वेचण्यासाठी घराबाहेर पडली. पुन्हा घरी परतलीच नाही. तिचे प्रेत सापडले एका शेतात. बैलगाडी रस्त्यातून तिचे प्रेत फरपटत त्या शेतात आणून टाकल्याची चिन्हे दिसत होती. तिच्याही डोक्यावर आणि गुप्तांगावर जखम. पोलिस डायरीत नोंद.. अकस्मात मृत्यू.२१ फेब्रुवारी १९७३ केरसुण्या तयार करणारी ३५ वर्षांची, नवऱ्याने सोडून दिलेली, मानवतला पारधी वाड्याजवळ राहणारी सुगंधा सुंदऱ्या ही महिला शिंदीच्या फांद्या आणण्यासाठी घराबाहेर पडली. संध्याकाळी तिचे प्रेत सापडले एका नाल्याजवळ. तिच्या गुप्तांगातून रक्त बाहेर पडलेले. पोलिस डायरीत नोंद अकस्मात मृत्यू. १३ एप्रिल १९७३ कु. नसीमा सय्यद करीम (१०) सायंकाळी दळण घेऊन पिठाच्या गिरणीकडे गेली. पण, वाटेतच गायब झाली. दुसरे दिवशी तिचे प्रेत आढळले एका शेताच्या धुऱ्यावर विचित्र स्थितीत. प्रेताचे मुंडके नाही...छातीवरचे मांस कापलेले... उजव्या हाताची करंगळी तोडलेली आणि गुप्तांगावर जखम.

आता मात्र पोलिस खाते जागे झाले. हा काही साधा खून प्रकार नाही हे लक्षात घेऊन तपास सुरू केला. परभणीचे त्यावेळी असलेले डीवायएसपी न. मा. वाघमारे यांनी १८ जून १९७३ रोजी या प्रकरणी उत्तमराव बारहाते, रुक्मिणी भागोजी काळे, तिचे वडील भागोजी पांडू काळे आणि रुक्मिणीचा भाऊ दगडू भागोजी काळे या चौघांना अटक केली.

या थरारक खूनसत्रामुळे मानवत परिसर हादरून गेला होता. भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. संशयाचे धुके दाट पसरत होते. या चार जणांच्या अटकेनंतर अकराव्या दिवशीच (२९ जून १९७३) मानवत परिसरातील रूढी गावाजवळ सौ. कलावती कृष्णाजी बोंबले या ३२ वर्षीय महिलेचा खून झाला. त्यानंतर चौदा दिवसांनंतर १३ जुलै १९७३ रोजी हालिमा अब्दुल अल्लाउद्दिन या १० वर्षे वयाच्या मुलीचा खून झाला. अतिशय छिन्नभिन्न अवस्थेत दगडाने ठेचलेले, नग्नावस्थेत तिचे प्रेत शेतात सापडले. खुनामागील रहस्य उलगडत नव्हते. भीतीचे वातावरण... थरार कायम होता. पोलिस हतबल झाले होते.

३० जुलै १९७३ रोजी उत्तमराव बारहाते, रुक्मिणी आणि तिचे वडील व भाऊ या चौघांची सशर्त जामिनावर सुटका झाली. मात्र, त्यांना मानवत शहरात प्रवेशबंदी आणि परभणी पोलिस ठाण्यात हजेरी द्यावी लागत असे. दरम्यान, सप्टेंबर १९७३ च्या दुसऱ्या आठवड्यात स्पेशल आयजीपी श्री. मोडक यांनी मानवत शहराला भेट दिली आणि मुंबईस परतल्यानंतर जाहीरपणे घोषित केले की, येत्या अठ्ठावीस तासांत मानवतच्या खून मालिकेतील खऱ्या गुन्हेगारास अटक करण्यात येईल. त्यानुसार बन्सी वाळके यास अटक केली गेली. तो बार फुसका ठरला. पण, अशा स्थितीत सातवा खून ९ ऑक्टोबर १९७३ रोजी झाला. नेहमीप्रमाणे सौ. पार्वती शंकर बारहाते (वय ३५) शेतकामासाठी दुपारी शेतातगेली. अन् दुसरे दिवशी तिचे प्रेत हायब्रीड ज्वारीत सापडले. अजूनही पोलिसांना या खुनाबाबत काही धागेदोरे हाती लागत नव्हते. म्हणून स्थानिक पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई पोलिस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी आणि पोलिस निरीक्षक व्ही. व्ही. वाकटकर मुद्दाम मानवतला आले. त्यांनी ६ ते ३० डिसेंबर १९७३ या कालावधीत मानवतमध्येच मुक्काम केला होता... परंतु कुलकर्णी, वाकटकर यांचे आगमन होताच ८ डिसेंबर १९७३ रोजी आठवा खून झाला. हे पोलिस खात्याला आव्हान होते की काय.. असेच म्हणावे लागेल. रुक्मिणीची बहीण समिंदराबाई हिच्याकडे कोंडिबा रूळे नावाचा बकऱ्या सांभाळणारा पोरगा होता. त्याचे प्रेत मुगाच्या पिकात सापडले. या खुनानंतर दोन दिवस उलटत नाहीत तोच..१० डिसेंबर १९७३ रोजी आरिफाबी नावाच्या दहा वर्षीय मुलीचे प्रेत सापडले. मानवत हत्याकांडातील हा नववा खून.

कुलकर्णी, वाकटकर यांनी केलेल्या विशेष तपासात धागेदोरे मिळाले व पोलिस कांही निर्णयाप्रत पोहचले. ३० डिसेंबर १९७३ रोजी कुलकर्णी, वाकटकर यांची पाठ फिरताच पाच दिवसांनंतर ४ जानेवारी १९७४ रोजी एकाच दिवशी भरदुपारी आपल्याला शेताकडे जात असताना सौ. हरिबाई ज्ञानोबा बोरवणे (३५), तिची ९ वर्षांची मुलगी तारामती आणि एक वर्षाची कमल या तिघींचा कुऱ्हाडीने निर्घृण खून झाला. ही घटना उमाजी लिंबाजी पितळे नावाचा शेतमजूर झुडपाआड दडून पाहात होता. (पुढे याची साक्ष न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरली.)

या तिहेरी खूनप्रकरणी देव्या बाजीराव, वामन अण्णा, सुकल्या चिंत्या आणि चिंत्या खंदारे चार जणांना अटक झाली. कोंडिबा रूळे खूनप्रकरणी रुक्मिणीची बहीण समिंदराबाई व बाज्या, पल्या या तिघांना यापूर्वीच अटक झालेली होती. याशिवाय मांत्रिक वैदू गणपत साळवे, उत्तमरावच्या शेतावरील मजूर सोपान थोटे आणि शंकर काटे, गेन्या लाड, रुक्मिणीचा भाऊ तुकाराम भागोजी, बहीण लक्ष्मी भागोजी आणि भागोजी चव्हाण असे एकूण १८ जणांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली.

मानवत खून मालिकाप्रकरणी नऊ गुन्हे दाखल झाले. मात्र, त्यातील कोंडिबा रूळे वेगळे करून आठ गुन्हे एकत्र करून १९ जून १९७४ रोजी सेलू येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश सी. जी. बायस यांच्या न्यायालयात एकच आरोप पत्र दाखल करण्यात आले. भा. दं. वि. १२० (ब), ३०२,१०९, व ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. आरोप पत्र ६९४ पृष्ठांचे होते. प्रथम न्यायदंडाधिकारी कार्यालयाने हे प्रकरण नियमानुसार जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग केले.

मानवत खून मालिका खटला

महाराष्ट्राभर खळबळ माजवणारा मानवत खून मालिका खटला सुनावणीस दि.१८ऑगस्ट १९७५ रोजी परभणी जिल्हा सत्र न्यायाधीश ना. शं. मानुधने यांच्या न्यायालयात प्रारंभ झाला. सरकारी वकील बॅ. एम. बी. व्होरा व ॲड. जी. पी. नांदापूरकर आणि आरोपीचे वकील बॅ. सी.बी. अग्रवाल व ॲड. बी.जी. कोळसे पाटील होते. फिर्यादी पक्षातर्फे एकूण २१९ साक्षीदार असल्याचे नमूद केले. मात्र, पहिल्या बावीस दिवसांत एकूण ९७ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.

माफीचा साक्षीदार मांत्रिक वैदू गणपत भागोजी साळवे याची सर्वांत प्रथम तर शेवटची ९७ वी साक्ष सीआयडी क्राईम इन्स्पेक्टर सी. ए. जोशी यांची झाली. माफीचा साक्षीदार गणपत साळवे याने आपल्या साक्षीत मुंजाच्या चार वेळा झालेल्या पूजेबाबत आणि माफीचा दुसरा साक्षीदार शंकर काटे याने आपण व सोपान थोटे दोघांनी मिळून ते पहिले चार खून कशा पध्दतीने केले, गुप्तांगातून रक्त कसे काढले व रुक्मिणीच्या वाड्यात कसे पोहचविले, त्या मुंजा पूजेच्या वेळी कोण कोण उपस्थित होते याबाबत माहिती दिली.

शेवटच्या तिहेरी खुनाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उमाजी पितळे यांनी दिली... हरिबाई आपल्या एक वर्षाच्या मुलीला कडेवर घेऊन जात होती. तिच्या मागे तिची दुसरी नऊ वर्षांची मुलगी जात असताना मारेकरी मागच्या बाजूने झपझप पाऊले टाकीत आले आणि कुऱ्हाडीचे सपासप घाव घालून तिघींना कसे मारून टाकले याबाबत सांगितले.

२० नोव्हेंबर १९७५ रोजी या खून खटल्याचा निकाल लागला. न्या. मानुधने यांनी रुक्मिणी, उत्तमराव बारहाते आणि सोपान थोटे या तिघांना फाशीची, तर दगडू, देव्या, सुकल्या व वामन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बाकी ९ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. परभणी सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध मानवत खटल्यातील आरोपींनी १९७६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचा निकाल ८ मार्च १९७६ रोजी लागला. त्यात रुक्मिणी भागोजी काळे आणि उत्तमराव बारहाते यांची फाशीची शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर सोपान थोटेची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. तसेच जन्मठेपेची शिक्षा झालेल्या चार आरोपींना जन्मठेपेएवजी फाशीची शिक्षा सुनावली. मुंबई उच्च न्यायालयाचे निकालपत्र २२१ पृष्ठांचे होते.

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चार आरोपींनी तसेच फाशीची शिक्षेतून मुक्तता मिळालेल्या रुक्मिणी व उत्तमराव यांच्या विरुध्द महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात १९७६ मध्ये धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. के. गोस्वामी आणि न्यायमूर्ती पी. एन. सिंघल यांच्या समोर चाललेल्या खटल्याचा निकाल १९ एप्रिल १९७७ रोजी लागला. त्यात रुक्मिणी भागोजी काळे आणि उत्तमराव बारहाते यांची निर्दोषता कायम ठेवली. तर सोपान थोटे दगडू, देव्या आणि सुकल्या यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आणि वामन अण्णा यास संशयाचा फायदा देऊन फाशीची शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता केली.

त्याबाबत स्पष्टता देताना निकालपत्रात म्हटले की...कायद्यानुसार गुन्ह्यातील साक्षीदार व त्याची साक्ष ही ग्राह्य धरणे योग्य असले तरी अशा साक्षीदाराची साक्ष इतर पुष्टी देणाऱ्या बाबीमधून एखाद्या व्यक्तीने केलेल्या गुन्ह्याबाबत कोणताही स्वतंत्र पुरावा समोर येत नसेल आणि तर न्यायालयाला अशी साक्ष ग्राह्य न धरण्याचा अधिकार आहे.

मानवत हत्याकांडच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकालानंतर सर्व परिस्थिती स्थिर झाल्यानंतर सुमारे ११ वर्षांनंतर २६ ऑगस्ट, १९८९ ला उत्तमराव बारहाते यांची मुलाखत घेण्यासाठी भेटलो. तोच पूर्वीचा रूबाबदारपणा, ताठ मानेने वावरणारे, समाधानी जीवन जगणारे, सहजपणे समाजात वावरणारे उत्तमराव दिसले. गप्पा सुरू झाल्या. उत्तमराव सांगत होते.. माझ्याजवळ जर पैसा नसता तर मीही फासावर लटकलो असतो. मी निर्दोष आहे हे पटवून देण्यासाठी मला साडेचार लाख रुपये खर्च लागले. चार माणसे केवळ पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी फासावर चढविण्यात आली. आयुष्यात आतापर्यंत मला तीन-चार वेळा जीवदान मिळालेले आहे. एकदा साप चावला. दुसऱ्यांदा देवीच्या दर्शनाला इटोलीला गेलो. तेथे विहिरीत पोहण्याचा आग्रह झाला. मला पोहता येत नव्हते... पण. ते इतरांना खरे वाटेना. मित्राने विहिरीत ढकलून दिले... नाकातोंडात पाणी शिरले. तेव्हा इतरांनी विहिरीबाहेर काढले म्हणून वाचलो. तिसऱ्या वेळी शेतात सायकलवरून जातांना वाटेत २५ ते ३० फूट लांबीचा आणि २३ फूट रुंदीचा साप अन् त्याचे लालभडक माणसासारखे डोळे पाहून तेथेच मी खाली पडलो. बेशुध्द अवस्थेत कोणीतरी मला घरी आणून सोडले. त्यावेळी मी २५ वर्षांचा होतो अन् आता ही फाशीची शिक्षा.

मला सांगा...माझ्याकडे भरपूर पैसा असतांना मी गुप्तधनासाठी असा अघोरीपणा कशाला करेन ? जमीन जुमला, शेतीवाडी आहे. जोडधंदा हातभट्टी व्यवसायाचा होता... दररोज खर्च वजा जाता माझ्या हाती ५०० रु. पडत होते. मानाचे नगरसेवक ते नगराध्यक्ष पद भोगले. संततीप्राप्तीसाठी म्हणाल तर.. मला दोन मुले आहेत. १९५० पासून रुक्मिणीचे माझे संबंध आहेत. तिचे लग्न झाले, पण ती नांदली नाही. तिच्या लग्नाच्या आधीपासून माझी तिची चांगली ओळख होती. ती म्हणाली मी तुमच्याजवळ राहते. म्हणून तिला एक तीन मजली जुना वाडा गावात घेऊन दिला. आधीपासूनच त्या वाड्यात पिंपळ आणि मुंजा होता. या वाड्यात ती आपल्या आई - वडिलांसोबत राहत होती.

माझ्या धर्मपत्नीचे नाव रुक्मिणी आहे अन् हिचे पण नाव रुक्मिणी आहे हा योगायोग आहे. वाड्यातील रुक्मिणीला सुध्दा १९६५ मध्ये माझ्यापासून मुलगा झाला होता, पण तो लगेच मरण पावला. रुक्मिणी भागोजी काळे वांझोटी नाही. त्यामुळे मी अपत्य प्राप्तीसाठी, गुप्तधनासाठी कोणत्याही प्रकारची धडपड किंवा प्रयत्न केला नाही.

सर्वोच्च न्यायालयात जेव्हा खटला चालू होता तेव्हा रुक्मिणी काळे गरोदर होती आणि ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला त्याच दिवशी तिने एका कन्यारत्नाला जन्म दिला. खून मालिका प्रकरणात पोलिसांनी खूप त्रास दिला. आता त्याच्या आठवणीसुध्दा नको वाटतात. सध्या शांतपणे जीवन जगतो आहे. आरामात आहे. लोकांकडून समाजाकडून कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. कधीही नव्हता. तपासाच्या वेळी पोलिसाने जप्त केलेला मुंजा अजूनही पोलिस ठाण्यात पडून आहे. वाड्यातले पिंपळाचे झाड तोडून टाकले. मी, रुक्मिणी आणि मुलगी त्या वाड्यात राहतो.. आनंदानं..समाधानानं.

१ डिसेंबर २०११ काही वृत्तपत्रांतील एक चार ओळीची बातमी माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक उत्तमराव जिजाजी बारहाते (९२) यांचे बुधवारी (३० नोव्हेंबर) पहाटे चारच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आंबेगाव रस्त्यावरील त्यांच्या शेतात दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

असा हा इतिहास मानवत हत्याकांडाचा. ५० वर्षांपूर्वीचा..

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT