मराठवाडा

परभणी : गंगाखेड न.पा. नवे प्रशासक डॉ.जीवराज डापकर यांची नियुक्‍ती

अमृता चौगुले

गंगाखेड(परभणी), पुढारी वृत्‍तसेवा : नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक तुकाराम कदम यांची राज्याच्या नगर विकास मंत्रालयाने अखेर प्रशासक पदावरून उचलबांगडी केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.जीवराज डापकर यांना प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कदम यांची प्रशासक पदावरून उचलबांगडी झाल्याने शहराच्या विविध पक्ष, संघटनांकडून तसेच शहरवासीयांकडून राज्य शासनाच्या या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. बुधवारी दुपारनंतर एसडीएम डॉ.डापकर यांनी प्रशासक पदाचा कार्यभारही स्वीकारला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, राज्यातील सर्व नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांची मुदत संपल्यानंतर राज्यभरातील नगर पालिकेवर शासनाने त्या- त्या विभागाचे एसडीएम प्रशासक म्हणून नेमले होते. मात्र गंगाखेड पालिका याबाबतीत अपवाद ठरली होती. तत्कालीन एसडीएमऐवजी मुख्याधिकाऱ्यांना प्रशासक पदाची सूत्रे सोपविण्यात आली होती. तत्कालीन सिओ वसुधा फड यांच्या बदलीनंतर दि.१३ डिसेंबर २०२२ रोजी तुकाराम कदम हे मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून रुजू झाले. प्रशासक म्हणून कामकाज पाहत असताना मनमानी पद्धतीने व काही लोकप्रतिनिधींच्या इशारावर एकतर्फी कामकाज सुरू असल्याने मागील सहा महिन्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर अनेक पक्ष, संघटनांकडून मनमानी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप प्रत्यारोप झाले.

अखेर दि.२२ ऑगस्ट रोजी शासनाच्या राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी- छापवाले यांच्या आदेशाने येथील पालिकेच्या प्रशासक पदी एसडीएम गंगाखेड यांच्या नियुक्तीचे आदेश धडकले. या आदेशाच्या अनुषंगाने दि.२३ रोजी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी विशेष आदेश काढत पालिकेच्या प्रशासक पदावरून मुख्याधिकारी कदम यांची उचलबांगडी करत एसडीएम डॉ.डापकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. गुरुवारी दुपारनंतर डॉ.डापकर यांनी मावळते प्रशासक कदम यांच्याकडून प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारला.

माजी नगराध्यक्ष मुंडेंची होती मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

प्रशासक तुकाराम कदम यांच्या मनमानी गैरव्यवहार कार्यपद्धतीची भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष राम प्रभू मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीत प्रशासक कदम यांच्या मनमानी कार्यपद्धतीचा पाढाच मुंडे यांनी वाचला होता. अखेर कदम यांची प्रशासक पदावरून उचलबांगडी झाल्याने माजी नगराध्यक्ष मुंडे यांनी भ्रष्टाचारी प्रशासक पदाचा अखेर शेवट झाल्याची प्रतिक्रिया देत राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

माजी आ.डॉ. केंद्रेंकडूनही कदम हटाव नारा

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांनीही तत्कालीन प्रशासक तुकाराम कदम यांच्या कार्यपद्धतीवर वेळोवेळी लेखी तक्रारी करून ताशेरे ओढले होते. राज्य शासनाकडे कदम यांच्या गैरव्यवहारी कारभाराचा पाठपुरावा डॉ.केंद्रे यांनी केला होता.

कदमांवर अंकुश गरजेचा होता – डॉ.सिद्धार्थ भालेराव

पालिकेचे प्रशासक तुकाराम कदम हे शासनाचे नव्हे तर ठराविक लोकप्रतिनिधींचे अधिकारी असल्याचा आवात वागत होते. प्रशासक हे शहराच्या विकासासाठी जनतेशी बांधील असतात हा विसर कदम यांना पडला होता. पालिकेत कदम यांनी भ्रष्टाचारासाठी कंत्राटदार- कर्मचाऱ्यांची साखळी तयार केली होती. पालिकेच्या प्रशासक पदी एसडीएम डॉ.डापकर यांची शासनाने नियुक्ती केल्याने मुख्याधिकारी कदम यांच्यावर मोठा प्रशासकीय अंकुर बसणे गरजेचा होता. यानिमित्ताने अखेर ते झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT