भोकरदन(जालना), पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र राजुर गणपती येथे मंगळवारी अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांचा महासागर लोटला होता. अंगारिका चतुर्थी निमित्त सुमारे आठ लाख भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतल्याचा अंदाज पुजा-यांनी वर्तवला आहे. मंगळवारी अंगारिका असली तरी सोमवार सकाळपासूनच हजारो भाविकांनी राजुरचा रस्ता धरला होता.
गेल्या काही दिवसांपासून धुके आणि ढगाळ वातावरणामुळे वातावरणात बदल झाला होता. मात्र रविवारपासून ढगाळ वातावरण गेल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. अशा थंडीत देखील श्रीक्षेत्र राजुर गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविक पायी दर्शनासाठी निघाले होते. श्रीगणपती दर्शनसाठी हजारो भाविकांचा पायी जथ्था सोमवारी रात्रीच दाखल झाला होता. पायी वारी करणार्या भाविकांसाठी विविध सेवाभावी संस्था, संघटनांनी ठिकठिकाणी चहा, फराळ आणि आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था केली होती.
सोमवारी रात्रीच राजूराला यात्रेचे स्वरूप आले होते. भाविकांची उसळलेली गर्दी लक्षात घेऊन गणेशभक्तांनी रात्री दहा वाजेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या गर्दीचा ओघ एकसारखा सुरू होता. बदललेले वातावरणात आणि थंडीमुळे भाविकांची संख्या कमी राहील हा अंदाज मात्र, भाविकांच्या गर्दीने सोमवारीच फोल ठरल्याचे दिसून आले. सध्या शेतकर्यांना रब्बी हंगामाच्या शेती कामातून उसंत मिळाल्याने देखील भाविकांचा जनसागर उसळला होता.
सोमवारीच श्रीक्षेत्र राजुर गणपतीच्या पंचक्रोशीतील रस्त्यांवर दिवसभर चौहोबाजूंनी भाविकांच्या पायी दिंडी टाळमृदंगाच्या गजरात गणरायाचा जयघोष करीत राजूरात दाखल होत होत्या. दरम्यान मंगळवारी श्रीक्षेत्र राजुर नागरी रात्री उशिरापर्यंत भक्तांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेली होती गर्दीचा एकसारखा सुरू होता.
मराठवाड्यातील जागृत देवस्थान आराध्य दैवत श्रीक्षेत्र श्री गणपती मंदिरात मंगळवारी असलेल्या अंगरिका चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर श्री गणपती संस्थांनच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. 2023 मधील ही पहिलीच अंगारिका चतुर्थी असल्याने वर्षातील पहिलीच चतुर्थी आहे.
अंगारकी चतुर्थीस येणा-या भाविकांची संख्या अधिक असल्याने श्रीगणपती संस्थान तसेच पोलिस प्रशासनाकडून सभामंडप, पार्किंग व्यावस्था, दर्शन रांगा, हरविलेल्या व्यक्तींची शोध मोहीम राबविण्यात आली. अंगारकी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन मंदीरासह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. व सुरक्षेसाठी 50 पोलिस अधिकारी व 500 कर्मचारी, पोलिस मित्र, स्वंयसेवक दलाचे कार्यकर्ते, संस्थानचे कर्मचारी, श्रींचे सेवेकरी आदींनी भाविकांना राजूरेश्वराचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी मोठे परिश्रम घेतले.
.हेही वाचा