Degloor youth killed over minor dispute
देगलूर : शहरातील मुख्य बाजारपेठेतील अंबिका ऑईल मिलच्या बाजूस असलेल्या देशी दारू दुकानात दोघांमध्ये झालेल्या किरकोळ व जुन्या वादावरून धारदार शस्त्राने मानेवर वार केल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज (दि.९) सकाळी ११ च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. तर आरोपी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
खून झालेल्या तरुणाचे नाव शेख निसार शेख बाबुमियाँ (वय ३०, रा. मदीना मस्जिद, लाईन गल्ली, देगलूर) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील अंबिका ऑईल मिलच्या बाजूस असलेल्या देशी दारू दुकानात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि देगलूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात सखोल तपास आणि साक्षीदारांची चौकशी करून तपास पथकांनी गुन्हेगारांचा शोध वेगाने सुरू केला असतानाच आरोपी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासात किरकोळ वादातून आरोपी शेख शादुल याने धारदार व तीक्ष्ण वस्तूने मृत शेख निसार याच्या मानेवर उजव्या बाजूला वार केल्याने हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव शेख शादुल सलीमसाब (वय ४५, रा.आनंदनगर, भायेगाव रोड, देगलूर) असे आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपाळ सुर्यवंशी करीत आहेत.