मुखेड : शेळीला वाचविण्यासाठी गेला असताना लागलेल्या विजेच्या धक्क्यात एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना नेवळी शिवारात घडली. योगेश उर्फ गोटू दिगांबर जाधव (वय २२) असे मृत तरूणाचे नाव आहे. मुखेड तालुक्यातील रूपचंद तांडा, भेंडगाव खुर्द येथील रहिवासी असलेला योगेश शुक्रवारी (दि.२७) रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास नेवळी शिवारात शेळ्या चारण्याण्याकरिता गेला होता.
त्यातील एक शेळी चारा खाण्याकरिता झाडाजवळ गेली. त्या झाडावरती सर्विस वायरची सपोर्टिंग तार लटकलेली होते. त्यामध्ये विजेचा प्रवाह चालू होता. शेळी पाला खात असताना तिला विजेचा धक्का बसला. त्यामुळे शेळी ओरडू लागली. यावेळी योगेश शेळीला वाचवण्याकरिता धावत गेला. तेव्हा त्यासही विजेचा जब्बर धक्का बसला. त्यात शेळी आणि योगेशचा जागीच मृत्यू झाला.
महिन्यापूर्वीच ५ मे रोजी या तरुणाचे बालाजी नगर सकनूर येथील मुलीशी विवाह झाला होता. या घटनेमुळे तरुणाच्या परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.