Yavatmal District Bank Unopposed Election  Pudhari
नांदेड

Yavatmal DCC Bank Election | यवतमाळ जिल्हा बँक निवडणुकीत खासदार संजय देशमुखांसह दोघे बिनविरोध

उमरखेडमध्ये तिरंगी लढत; महागावात भुतडा यांचा बिनविरोधाचा ‘फॉर्म्युला’ फसला

पुढारी वृत्तसेवा

Yavatmal District Bank Unopposed Election

उमरखेड : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, बुधवारी, राजकीय घडामोडींना अचानक वेग आला. उमेदवारांच्या माघारीनंतर दिग्रस, पुसद, उमरखेड आणि महागाव तालुका गटांतील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. दिग्रस आणि पुसद तालुका गटांत प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध झाल्याने दोन जागांवरील निवडणुकीची रंगत संपली असली, तरी उमरखेड आणि महागावसह अन्य गटांमध्ये चुरस कायम आहे.

दिग्रस, पुसदमध्ये बिनविरोध

दिग्रस तालुका गटातून खासदार संजय देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. या गटाकडे सुरुवातीपासूनच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने देशमुख यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

पुसद तालुका गटातून विजय जाधव यांचीही बिनविरोध निवड झाली. दोन्ही जागा महायुतीच्या वाट्याला गेल्याने मतदानापूर्वीच महायुतीला या निवडींच्या माध्यमातून बळ मिळाले आहे.

उमरखेडमध्ये तिरंगी लढत

उमरखेड तालुका गटात मात्र तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेसकडून राम देवसरकर, भाजपकडून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर आणि नांदेडचे डॉ. अंकुश देवसरकर यांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत.

प्रकाश पाटील देवसरकर हे गेल्या २८ वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यांच्या उमेदवारीला राम देवसरकर यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील निर्णयावर प्रकाश पाटील देवसरकर यांच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून आहे. न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्यास डॉ. अंकुश देवसरकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार राहतील आणि त्यांची काँग्रेसचे राम देवसरकर यांच्याशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे न्यायालयीन निर्णयासह उमरखेड गटातील निवडणुकीकडे आता राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

महागावात बिनविरोधाचा प्रयत्न फसला

महागाव तालुका गटात महायुतीकडून भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीला आमदार इंद्रनील नाईक यांचा सुरुवातीला विरोध असल्याची चर्चा होती. त्यानंतर महागावातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या होत्या.

शिवाजीराव देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर, आमदार इंद्रनील नाईक यांच्या कोट्यातून रिंगणात उतरतील, अशी चर्चा होती. मात्र, अखेर शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसकडून आपली उमेदवारी कायम ठेवल्याने महागावातील बिनविरोध निवडीचा प्रयत्न फसला आहे. परिणामी या गटातही आता निवडणुकीची चुरस वाढली आहे.

माघारीच्या दिवशी समीकरणांना कलाटणी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा सुरुवातीपासूनच इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे अनेक तालुका गटांत उमेदवारी अर्जांची संख्या वाढली होती. छाननीनंतरही अनेक उमेदवार रिंगणात कायम राहिल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे होती. मात्र, माघारीच्या अंतिम दिवशी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे काही गटांतील समीकरणांना कलाटणी मिळाली.

एका बाजूला भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) अशी राजकीय मांडणी दिसत आहे. त्यामुळे उर्वरित तालुका गटांतील लढतींकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

दिग्रस आणि पुसद गटांतील बिनविरोध निवडीमुळे दोन जागांचे चित्र स्पष्ट झाले असले, तरी जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हातात जाणार, हे ठरविण्यात उर्वरित गटांतील निकाल महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT