Women in Gondhankhed stage protest over water
केंद्रा बु. : पुढारी वृत्तसेवा सेनगाव तालुक्यातील गौधनखेडा येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावात पाण्याचा थेंबही मिळत नसल्याने संतप्त महिलांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. तब्बल सात तासानंतर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
गौधनखेडा येथील ग्रामस्थांना आतापर्यंत खाजगी नळाद्वारे दरमहा ३०० रुपये देऊन पाणीपुरवठा केला जात होता. मात्र सध्या भूजल पातळी खालावल्याने शेतीसाठी पाणी अपुरे पडत असल्याने संबंधित शेतकऱ्याने गावाकडे होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
गावात पाण्याची टाकी उभारण्यात आली असून खाजगी शेतात विहीर खोदून सुमारे दोन वर्षांपूर्वी पाणीपुरवठ्याची चाचणीही घेण्यात आली होती. मात्र तेव्हापासून या टाकीत पाण्याचा एक थेंबही पडलेला नाही. टाकी असूनही पाणी नाही आणि पर्यायी व्यवस्थाही नसल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी परवड सुरू आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी पंचायत समितीच्या संबंधित विभागाला निवेदन देऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली होती. मात्र दोन-तीन दिवस उलटूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत पाणी मिळत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. विशेष म्हणजे, आंदोलन सुरू असताना ग्रामसेवक, सरपंच आणि पाणीपुरवठा सेवक यापैकी कोणीही घटनास्थळी फिरकले नसल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली.
सुमारे सात तासानंतर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्पुरत्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी आर. बी. होळकर, बी. एस. शिंदे, कनिष्ठ अभियंता पी. एस. सुरुशे तसेच गोरेगाव पोलिस ठाण्याचे प्रेमप्रकाश माकोडे, साहेबराव राठोड, निवृत्ती बडे आदींनी महिलांची समजूत काढली.
या आंदोलनात आशा शामराव ढाकरे, दीपमाला लक्ष्मण ढाकरे, कलावती केशव पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त महिलांनी दिला. या आंदोलनाची प्रशासन दखल घेणार का याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ढाकरे, जनाबाई गंगाराम ढाकरे, सुशीला दिलीप फुकाटे, सुनीता संतोष ढाकरे, लक्ष्मी अशोक ढाकरे, रेखा रतन ढाकरे, रेखा विष्णू ढाकरे, लीलाबाई तानाजी ढाकरे, सुनीता भगवान खिल्लारे, सुमन उत्तम खिल्लारे, आशा संजय खिल्लारे, जमुनाबाई परसराम खिल्लारे, गंगूबाई तुळशीराम खिल्लारे, लक्ष्मीबाई राजाराम खिल्लारे यांच्यासह गावातील अनेक महिलांनी सहभाग घेतला होता.