Hit and run Kinwat woman death
किनवट : पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.२६) घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मौजे कोठारी येथील नंदाबाई गौतम पाईकराव (वय ५०) या गुरुवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. एमआयडीसीलगत असलेल्या नांदेड मार्गावरील महामार्गावर पेट्रोल पंपाजवळून जात असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पुढील तपास सुरू आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या व्यक्तीस पहाटे धडक देण्याची ही किनवट शहरातील तिसरी घटना असून, यापूर्वीच्या दोन्ही घटनांमध्येही संबंधितांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पहाटे रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.