हिमायतनगर : तालुक्यातील मौजे पार्डी येथे सोमवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वारे व अवकाळी पावसाचा जोर सुरू असताना वीज कोसळून एका महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशाखा सचिन येलकेवाड (वय अंदाजे ३० वर्षे) या शेतात हळद काढणीचे काम करत असताना ही दुर्घटना घडली.
तलाठी संजय बिऱ्हाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमायतनगर शहर व तालुका परिसरात अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होताच जोरदार कडकडाटासह वीज कोसळली. त्यात विशाखा येलकेवाड या गंभीर जखमी झाल्या. स्थानिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे पार्डी गावासह संपूर्ण हिमायतनगर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. येलकेवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. घटनेची माहिती तलाठी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असून महसूल विभागाकडून सकाळी पंचनामा करण्यात येणार आहे. मयत महिलेच्या पश्चात पती चार वर्षांचा मुलगा परिवार आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन व नैसर्गिक आपत्ती अनुदानाच्या माध्यमातून मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.