बिलोली : या भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास ही माझी जबाबदारी असून, पशुपालन, कुकुटपालन, बायोगॅस निर्मिती, दुग्ध व्यवसाय, गोमाता आधारित कृषी व्यवस्थापनाच्या माध्यमातून धवल क्रांती आणण्याचा माझा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी सगरोळी (ता.बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
यावेळी अध्यक्षस्थानी संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, आमदार जितेश अंतापुरकर, दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानाचे प्रणेते दादा लाड, जिल्हा कृषी विकास अधिकारी निलकुमार ऐतवडे, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी दिलीप दम्मय्यावार, सरपंच गोदावरी उस्केलवार, लक्ष्मण ठक्करवाड, चंदू पाटील सावळीकर, उमाकांत गोपछडे, हावगीराव गोपछडे इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
गोमाता आधारित अर्थरचना व शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी येथील कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन व सहकार्य लाभदायक ठरेल. सगरोळी परिसरात एखादे मॉडेल उभे करून संपूर्ण जिल्ह्यात सुरू करण्यात माझा पुढाकार असेल असेही ते म्हणाले. आमदार अंतापूरकर यांनी माझ्या मतदारसंघात येथील संस्था शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेऊन कार्य करीत असल्याने या भागातील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळत असून याचा माझ्यासह हजारो शेतकरी बांधवांना अभिमान आहे. येथील तंत्रज्ञान महोत्सवाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील केले.
खासदार गोपछडे यांचा धवल क्रांतीचा विचार हा परिसरासाठी नवसंजीवनी देणारा ठरेल. दुर्दैवाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्र मोडकळीत निघाले आहे. धवलक्रांतीच्या माध्यमातून झालेली हानी भरून काढावी लागेल. राज्य व केंद्रातील सरकार कृषी क्षेत्रासाठी सकारात्मक असून कृषी विज्ञान केंद्रातील उपक्रमांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे कुलगुरू इंद्रमनी मिश्रा यांनी कोरडवाहू शेतीमध्य येणाऱ्या समस्या यावर उपाययोजना याबाबत दृकश्राव्यच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवास हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती.
गुरुवार (ता.३०) रोजी महिला मेळाव्याचे आयोजन केले असून महिला बालकल्याण मंत्री मेघनाताई बोर्डीकर व आमदार चित्राताई वाघ यांची उपस्थिती राहणार आहे.