wedding File Photo
नांदेड

Drought Impact on Weddings: यंदा लग्नसराईत ५८ मुहूर्त; पण दुष्काळाचे सावट, लग्नाचा खर्च वाढणार?

नोव्हेंबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत तब्बल ५८ विवाह मुहूर्त असल्याने सनई-चौघड्यांचा निनाद ऐकू येणार असला, तरी यंदाच्या लग्नसराईवर पाणीटंचाई आणि दुष्काळाचे सावट राहण्याची शक्यता आहे.

पुढारी वृत्तसेवा

Drought Impact on Weddings

उमरखेड : चातुर्मासाची सांगता आणि तुळशी विवाहानंतर यंदाच्या लग्नसराईला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत पंचांगानुसार तब्बल ५८ विवाह मुहूर्त असल्याने सनई-चौघड्यांचा निनाद ऐकू येणार असला, तरी यंदाच्या लग्नसराईवर पाणीटंचाई आणि दुष्काळाचे सावट राहण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात पाण्याची टंचाई तीव्र होत असताना विवाह सोहळ्यांसाठी लागणाऱ्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार असल्याने आयोजकांच्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.

यंदा विवाह मुहूर्तांची संख्या चांगली असल्याने मंगल कार्यालये, केटरर्स, बँड पथके, सजावट व्यावसायिक, फोटोग्राफर्स तसेच सराफ आणि कापड बाजारात लगबग सुरू झाली आहे. मात्र मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा विवाहसोहळ्यांच्या खर्चाचा ताळमेळ साधताना वधू-वरांच्या कुटुंबांना अधिक नियोजन करावे लागणार आहे.

पाण्याचा प्रश्न ठरणार महत्त्वाचा

विवाहसोहळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी लागते. स्वयंपाक, पिण्याचे पाणी, पाहुण्यांची व्यवस्था आणि स्वच्छता यासाठी पाण्याची गरज असते. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाई जाणवत असल्याने मंगल कार्यालयांनाही पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागू शकते. त्यामुळे टँकर किंवा अन्य पर्यायी व्यवस्थेचा खर्च विवाहाच्या एकूण बजेटवर पडण्याची शक्यता आहे.

दिखाव्यापेक्षा साधेपणाला पसंती?

दुष्काळी परिस्थितीचा आर्थिक परिणाम शेतकरी कुटुंबांवर अधिक जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या खर्चाचे विवाहसोहळे टाळून मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत साधेपणाने विवाह करण्याकडे काही कुटुंबांचा कल वाढू शकतो. पारंपरिक पद्धतीने कमी खर्चात विवाह करण्याला यंदा अधिक महत्त्व मिळण्याची शक्यता आहे.

बाजारपेठेला मात्र आशेचा किरण

विवाह मुहूर्तांची संख्या चांगली असल्याने सराफा, कापड, फुलविक्रेते, भांडी, फर्निचर, वाहन भाडे, केटरिंग, सजावट आणि फोटोग्राफी व्यवसायाला लग्नसराईतून चांगली उलाढाल अपेक्षित आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्यास त्याचा थेट परिणाम या व्यवसायांवरही होऊ शकतो.

फेब्रुवारी, मेमध्ये सर्वाधिक मुहूर्त

पंचांगानुसार नोव्हेंबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत ५८ विवाह मुहूर्त आहेत. नोव्हेंबरमध्ये २३, २४, २५, २६, २९, ३०; डिसेंबरमध्ये २, ३, ४, ९, १०, ११, १३, १४; जानेवारीत १६, १७, १८, १९, २२, २३, २८; फेब्रुवारीत २, ३, ५, ६, ७, ११, १२, १३, १८, १९, २०, २१; मार्चमध्ये २, ३, ६, ८, ९; एप्रिलमध्ये १६, १७, १८, २१, २२, २८; मेमध्ये २, ३, ४, ६, ७, १३, १४, २०, २१ आणि जूनमध्ये २, ३, ४, ११, १२ या तारखा आहेत.

पंचांगानुसार विवाह मुहूर्तांची रेलचेल असली तरी प्रत्यक्ष विवाहाची वेळ स्थानिक पंचांग आणि वधू-वरांच्या पत्रिकेनुसार बदलू शकते. त्यामुळे यंदाची लग्नसराई मंगलमय वातावरण घेऊन येत असली, तरी पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खर्च, पाणी आणि पाहुणचाराचे नियोजन हे विवाह आयोजकांसमोरील महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT