संविधान, युवाशक्ती अन् लोकशाहीचा विजय file photo
नांदेड

Nanded News : संविधान, युवाशक्ती अन् लोकशाहीचा विजय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर खा. रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

Victory for the Constitution, Youth Power, and Democracy

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा म्हणजे देशाचे संविधान, लोकशाही आणि युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. युवाशक्तीच्या आक्रमकतेपुढे अहंकारी आणि मुजोर मोदी सरकारला नांगी टाकावी लागली. काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्याही लढ्याचे हे यश आहे, अशी प्रतिक्रिया खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केली.

खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले, मोदी सरकारने देशातील शिक्षण व्यवस्थेची अक्षरशः वाट लावली आहे. एवढेच नव्हे तर केंद्रीय अर्थसंकल्पातील शिक्षण विषयक तरतुदींमध्येही मोठी कपात सुरू केली आहे. वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त होत आहे. नैराश्येतून असंख्य विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपविले आहे.

अशा परिस्थितीत नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याऐवजी मोदी सरकारने देशातील विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी हल्ला करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे पाप केले आहे. यावर कहर म्हणजे युवाशक्तीला पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनाही दबाव तंत्राचा वापर करून त्यांना ताब्यात घेतले.

परंतु युवाशक्तीच्या एकजुटीपुढे आणि आक्रमकतेपुढे अहंकारी सरकारला अखेर झुकावेच लागले. यापुढे देशातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा होणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास युवाशक्ती पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. देशातील युवक हेच देशांचे भविष्य आहेत, त्यांच्या संयमाचा सरकारने अंत पाहू नये, मोदी सरकारने त्यांच्या सर्व मागण्या तत्काळ मान्य केल्या पाहिजेत. असे खासदार रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT