Unseasonal Rain  
नांदेड

Unseasonal Rain nanded | हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान

हाता-तोंडाशी आलेल्या गहू, हरभरा व फळबागांवर अस्मानी संकट कोसळल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे

पुढारी वृत्तसेवा

हिमायतनगर : तालुक्यासह परिसरात सोमवारी मध्यरात्री अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू व हरभरा ही पिके पावसाच्या तडाख्यामुळे आडवी पडली असून अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आहे.

अनेक शेतकऱ्यांनी कापून शेतात व खळ्यावर ठेवलेला हरभरा भिजल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच फळबागांनाही वादळी वाऱ्याचा फटका बसला असून काही ठिकाणी फळगळ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका दिला आहे. यापूर्वी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच नुकसानीत होता. रब्बी हंगामातील उत्पादनातून नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा असतानाच हाता-तोंडाशी आलेल्या गहू, हरभरा व फळबागांवर अस्मानी संकट कोसळल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

या अवकाळी पावसाच्या फाटक्याचे तत्काळ पंचनामे करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. कृषी व महसूल विभागाने तातडीने पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT