नरेंद्र येरावार
उमरी : आठ जून रोजी सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडेच गेले, त्यानंतर 22 जून रोजी सुर्याचा आर्द्रा नक्षञाने गाढवाचे वाहन घेऊन प्रवेश केला. या नक्षत्राला सुरुवात होऊन चार पाच दिवसाचा कालावधी लोटला असताना देखील पेरणी योग्य पाऊस झालाच नाही. आतापर्यंत केवळ 49 मिमी पावसाची नोंद झाली. परंतु शंभर मिमी पाऊस पडल्या शिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनी केले आहे.
गतवर्षी मृग नक्षत्रांनी साथ दिल्याने शेतकऱ्यांनी आतापर्यंत पेरणी आटोपून पंढरीच्या वारीची तयारी केली होती. परंतु यंदा मृग नक्षत्र कोरडेच गेले असून आर्दा नक्षत्रांनी हुलकावणी दिली. त्यामुळे या भागातील पेरण्या पूर्णतः खोळंबल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची सुविधा आहे अशा काही मोजक्याच शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली खरी परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून केवळ ढगाळ वातावरण निर्माण झाले असले तरीही पेरणी योग्य पाऊस झालाच नाही.
काही भागात वादळी वाऱ्यासह विजा चमकल्या, लाईट गेली, मोबाईलचे नेटवर्क गेल्याने अनेकांची पंचाईत झाली. परंतु पाऊस मुसळधार पाऊस काही पडत नाही. गुरूवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाची प्रतिक्षा करत असलेले शेतकरी शेतात होते. त्यामुळे उमरीच्या बाजारपेठेत माञ शुकशुकाट जाणवत होता. आता नदी नाले तलाव कोरडे पडत आहेत. लवकर पाऊस झाला नाही तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.