नांदेड

Umri fertilizer fraud | उमरीत खताच्या बॅगेत आढळली वाळू

या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे

पुढारी वृत्तसेवा

उमरी : खरीप हंगामाच्या तोंडावर काळ्या आईची सेवा करणाऱ्या बळीराजाला फसवणारा एक धक्कादायक प्रकार उमरीत समोर आला आहे. उमरी येथील 'श्री मातोश्री ॲग्रो एजन्सी'मधून खरेदी केलेल्या खताच्या पिशवीत चक्क वाळू आणि खडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा पारा चढला असून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कुदळा येथील शेतकरी पंडित पाटील जाधव यांनी पेरणीच्या तयारीसाठी उमरी शहरातील'श्री मातोश्री ॲग्रो एजन्सी'मधून 'क्लासवन झिंकटेड सुपर फॉस्फेट' या खताच्या बॅग्स खरेदी केल्या होत्या. मात्र घरी जाऊन बॅग उघडल्यानंतर त्यांना धक्काच बसला. खताच्या ऐवजी बॅगेत वाळू आणि खड्यांचे मिश्रण निघाल्याने शेतकऱ्याची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकारामुळे कृषी विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या मते जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी अमोल पेकम, मोहीम अधिकारी सचिन कपाळे आणि उमरीचे गुणनियंत्रण निरीक्षक लखमोड हे अधिकारी केवळ यांचे सोईस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नायगाव तालुकाध्यक्ष गजानन पाटील होटाळकर यांनी केला आहे. एकतर शेतकरी पावसाची वाट पाहत असताना त्याला बोगस खतांच्या विळख्यात अडकवले जात आहे. याला सरकारी यंत्रणा जबाबदार आहे?....

केवळ चौकशीचे नाटक न करता, संबंधित खत कंपनी, विक्रेता आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच कंपनीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकारामुळे परिसरात बोगस खत विक्रेते आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष दिसून येत आहे. प्रशासनावर यावर काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संदर्भात तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांच्याशी संपर्क साधला असता कृषी केंद्राची गुण नियंत्रण निरीक्षक राम लखमोड व अनिल जोंधळे यांनी तपासणी केली असून तपासणीदरम्यान खताचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आला आहे. संबंधित खताची गुणवत्ता व मानकांबाबतचा निष्कर्ष प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होईल असे सांगितले.

या संदर्भात कृषी सेवा केंद्र असोसिएशनचे अध्यक्ष साहेबराव शिंदे बोळसेकर यांच्याशी संपर्क साधला असता खत कंपनी आमची नाही.आम्ही पैसे देऊन कंपनीकडून माल खरेदी करून घेतो. जीएसटीची बिले भरून खते उचलली आहेत. पोत्यात काय भरले आहे हे आम्हाला माहीत नाही असे सांगितले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT