Nanded News
उमरी : नरेंद्र येरावार
उमरी तालुक्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया जाण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी उमरी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतातील सर्वच पिके जळून खाक झाली आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे. सध्या सोयाबीनमध्ये शेंगा भरण्याचा आणि कापसाला बोंड लागण्याचा महत्त्वाचा कालावधी आहे. याच काळात पावसाचा खंड पडल्याने हाताशी आलेली पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत.
जिल्ह्यातील परिस्थिती पाहता कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी दोन लाखाची मदत द्यावी, विमा कंपन्यांना १०० टक्के पिक विमा वाटप करण्याचे आदेश द्यावेत, पिक विम्यामध्ये आवश्यक असणाऱ्या चार टप्प्यांचा समावेश करावा, जेणेकरून खंडित पावसाचाही लाभ मिळेल.
आगाऊ रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी प्रती हेक्टर २५ हजार रुपये तात्काळ अदा करावेत, सन २०२३-२४ आणि २०२४-२५ चा खरीप पिक विमा अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही, तो तात्काळ वाटप करावा, श्रीरामसागर (पोचमपाड) प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे अनेक वर्षांपासून शेती संकटात आहे. या बँक वाटपाबाबत मंत्रालयात तात्काळ बैठक लावावी, बाभळी बंधाऱ्याचा थकीत मोबदला तात्काळ वाटप करावा, टंचाई लक्षात घेऊन जनावरांच्या वैरणीसाठी अनुदान द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
ही परिस्थिती अशीच राहिल्यास शेतकऱ्यांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहणार आहे. शासनाने गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. भगवान मनुरकर, सुभाषराव गोरठेकर, राजेश्वरराव वंगलवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष देशमुख गोरठेकर, छावाचे माधवराव ताटे, शिवसेनेचे साहेबराव पाटील शिंदे, कैलास पाटील पवार हातनीकर, बालाजीराव सुर्यवंशी बितनाळकर, दिगंबर जगताप, बापूराव पाटील ढगे, बालाजी पाटील ढगे ईज्जतगावकर, राजेश जाधव, योगेश मोरे, बालाजी जाधव, नागेश पांढरे, राजू पाटील, लक्ष्मण सावंत, दिलीप सावंत, श्रीनिवास वाघे, यशपालसिंग, दत्ता साधू, गंगाधर आडेल यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. येत्या १७ सप्टेंबरपासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.