उमरखेड: उमरखेड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रलयंकारी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला असून, अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
परिस्थिती इतकी भीषण आहे की, नागरिकांचे रक्षण करणारी पोलीस यंत्रणाच आता मदतीच्या प्रतीक्षेत आहे. दराटी येथील पोलीस ठाणे आणि वसाहत कमरेइतक्या पाण्यात बुडाल्याने प्रशासकीय कामकाजाचा बोजवारा उडाला आहे, तर दुसरीकडे चातारी, ढाणकी परिसरातील गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील पावसाचा सर्वाधिक फटका चातारी, दराटी आणि ढाणकी या परिसराला बसला आहे. चातारी गावात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला. शनिवारी गावात पाणी शिरले असताना, एका अंत्ययात्रेसाठी निघालेले दोन गावकरी पुराच्या लोंढ्यात वाहून जाताना थोडक्यात बचावले. या घटनेमुळे गावातील दहशतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. दराटी येथील पोलीस ठाणे आणि कर्मचाऱ्यांची वसाहत पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. कमरेपर्यंत पाणी साचल्याने महत्त्वाची कागदपत्रे, शस्त्रसाठा आणि इतर शासकीय साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. ढाणकी शहरातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. बिटरगाव रस्त्यावरील अटारीच्या नाल्याला आलेल्या पुरामुळे पैनगंगा अभयारण्यातील अनेक गावांचा शहराशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या दोन दिवसांत झालेला पाऊस संपूर्ण पावसाळ्याच्या सरासरीइतका आहे. पैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यातच, इसापूर धरणाचे नऊ दरवाजे प्रत्येकी ५० सेंटिमीटरने उघडण्यात आल्याने नदीच्या विसर्गात मोठी वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या देवसरी, ब्राह्मणगाव, बंदीभागातील, कोरटा या गावांमध्ये धोक्याची पातळी वाढली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्याच्या परिस्थितीमुळे नागरिकांना २००६ साली पैनगंगा नदीला आलेल्या महापुराची आठवण झाली आहे. त्यावेळी पळशी गाव पूर्णपणे पाण्यात बुडाले होते आणि गावकऱ्यांना हेलिकॉप्टर व बोटींच्या साहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले होते. त्याच घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती आता नागरिकांच्या मनात घर करून आहे. शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला आहे. स्थानिक प्रशासनाने पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.