Truck transporting illegal sand seized
नवीन नांदेड, पुढारी वृत्तसेवा : गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असून, एकूण ४० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेख आसीफ शेख अजगर यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोनि ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउपनि ज्ञानेश्वर मटवाड व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत होते. विष्णुपुरी येथे ते आले असता त्यांना पिंपळगाव निमजी येथून अवेध रेतीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी तेथे जावून हायवा (एमएच-२६, बीडी-१२१३) तसेच चार ब्रास रेती असा एकूण ४० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी स्वप्नील दिलीप चौदंते (रा. मुदखेड), सचिन कदम (रा. जानापुरी) यांच्यावर नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोउपनि ज्ञानेश्वर मटवाड, वसंत केंद्रे, विष्णू कल्याणकर, संतोष पवार, मारोती पचलिंग, जमीर शेख, धम्मपाल कांबळे आदींनी केली आहे.