Tribal woman murdered for refusing marriage
किनवट, पुढारी वृत्तसेवा : पाटोदा (खुर्द) येथील एका आदिवासी अविवाहित महिलेचा लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून ओळखीच्या तरुणाने धारदार शस्त्राने पोटात वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दत्ता कोंडीबा धुमाळे ४९, रा. पाटोदा खुर्द, ता. किनवट) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची बहीण मंगल कोंडीवा धुमाळे (४५, 'आंध' आदिवासी समाज) ही पाटोदा खुर्द येथे एकटी राहत होती आणि भाऊ व आई जवळच शेजारी रहात होते. गावातीलच कृष्णा गणेश जाधव (३५ ) हा तिच्या ओळखीचा असून तो नेहमी तिच्याकडे येत असे. त्यात जवळीकता वाढून दोघांमध्ये संबंध (निर्माण झाले होते. आरोपीला दारूचे व्यसन होते आणि त्याला मंगलशी विवाह करायचा होता, मात्र ती वारंवार नकार देत असल्याने दोघांमध्ये अधूनमधून वाद होत असत.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, २४ ते २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री आरोपी कृष्णा मंगलच्या घरी गेला होता. लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून झालेला वाद तीव्र होऊन संतापाच्या भरात त्याने धारदार शस्त्राने मंगलच्या पोटात वार करून तिचा जागीच खून केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, त्याचा शोध घेणे वेगात सुरू आहे. घटनास्थळी पंचनामा व तपास कामात पोहेकॉ. सिद्धार्थ वाघमारे, प्रदीप आत्राम, ओंकार पुरी, वाहतूक शाखेचे पोहेकॉ. सदाशिव अनंतवार आणि महिला पो. कॉ. सुरेखा गोरे यांनी सहभाग नोंदविला.
किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे रजेवर असल्याने, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार या प्रकरणाचा तपास माहूर उपविभागीय पोलिस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासाची सूत्रे पोलिस निरीक्षक देवीदास चोपडे यांच्या हाती असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.