प्रशांत भागवत
उमरखेड : पैनगंगा वन्यजीव अभयारण्यात पर्यटन सुरू झाल्यानंतर प्रथमच टिपले गेलेले देखणे छायाचित्र सध्या चर्चेचा विषय ठरत असतानाच, अभयारण्यातील नर वाघ 'जॉनी' (PNG-T1) याने जोडीदाराच्या शोधात भ्रमंती सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल दोन वर्षांपासून अभयारण्यात एकटाच वास्तव्य करणारा जॉनी आता पैनगंगा सोडून पुसद प्रादेशिक वन विभागाच्या हद्दीत दाखल झाल्याची चर्चा वनवर्तुळात रंगली आहे.
जॉनीचा जन्म ७ मे २०२२ रोजी टिपेश्वर अभयारण्यात पिलखान ही वाघिणी आणि द स्टार या नर वाघापासून झाला. त्यानंतर त्याचे पैनगंगा वन्यजीव अभयारण्यात स्थलांतर करण्यात आले. येथे त्याने आपले स्वतंत्र क्षेत्र निर्माण केले आणि अभयारण्याला कायमस्वरूपी निवासस्थान बनविले.
काही काळासाठी त्याच्या जोडीला 'इंदू' (आय-मार्क) ही वाघीण होती. मात्र, इंदू दुसऱ्या भागात गेल्यानंतर जॉनी पुन्हा एकटाच राहिला. त्याच्यासाठी नव्याने 'लैला' या वाघिणीचेही स्थलांतर करण्यात आले होते; मात्र दोघांची प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वीच परिस्थिती बदलली. परिणामी, जॉनीचा एकटेपणा कायम राहिला.
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, प्रौढ नर वाघ जोडीदाराच्या आणि नवीन अधिवासाच्या शोधात अनेक किलोमीटरपर्यंत भ्रमंती करतात. त्यामुळे जॉनीचे पुसद वनक्षेत्राकडे झालेले स्थलांतर ही नैसर्गिक प्रक्रिया मानली जात आहे. यापूर्वीही टिपेश्वर, पैनगंगा आणि पुसदच्या जंगलांदरम्यान अनेक वाघांची ये-जा झाल्याची नोंद आहे. काही वाघांनी बुलढाणा, संभाजीनगर, अगदी सोलापूरपर्यंतही लांबचा प्रवास केल्याची उदाहरणे आहेत.
दरम्यान, पैनगंगा अभयारण्यात पर्यटन सुरू झाल्यानंतर जॉनीचे टिपलेले पहिले छायाचित्र वन्यजीवप्रेमींसाठी आकर्षण ठरले आहे. वन विभागाच्या सातत्यपूर्ण संवर्धनामुळे पैनगंगा अभयारण्यात वाघांसह इतर वन्यजीवांसाठी पोषक अधिवास निर्माण झाला आहे. आता मात्र एकच प्रश्न सर्वांना पडला आहे. जॉनीची ही भ्रमंती नेमकी कुठे थांबणार? त्याला योग्य जोडीदार मिळणार का? याकडे वन्यजीवप्रेमींचे लक्ष लागले आहे.