Three murders in 24 hours in Nanded; district shaken!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : दोन महिन्यांपूर्वी टोळीयुद्ध (गँगवॉर) आणि लागोपाठ झालेल्या खुनांच्या सत्रानंतर पोलिसांनी 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे कुठे जिल्हा शांत होतोय असे वाटत असतानाच, गुन्हेगारी प्रवृत्तीने पुन्हा एकदा आपले हिंस्र डोके वर काढले आहे. गेल्या अवघ्या २४ तासांत जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या खुनांच्या घटनांनी आणि एका जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सर्वसामान्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, यातील बहुतांश घटना कोणत्याही पूर्वनियोजनाशिवाय, केवळ 'रागाच्या भरात आणि शुल्लक कारणांवरून घडल्या आहेत. हे विशेष आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकाला आज 'जीव मुठीत धरून' घराबाहेर पडावे लागत आहे.
पोलिसांसमोर मोठे आव्हान...
जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी सातत्याने मोहिमा राबवल्या आहेत. परंतु, समाजात अचानक वाढणारा राग आणि गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलिसांना आता अधिक कडक पावले उचलून गुन्हेगारांची पाळेमुळे खणून काढावी लागणार आहेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.
पोलिसांनी २४ तासांत आवळल्या मुसक्या
या चारही घटनांची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस दलाने तातडीने चक्र फिरवली. सर्व घटनांमधील एकूण ७ आरोपींना पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे. नांदेड जिल्ह्याची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आता केवळ पोलीस बंदोबस्त पुरेसा नाही, तर कुटुंबांनी आणि समाजानेही आपल्या मुलांच्या मानसिकतेकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तरुण पिढी भरकटतेय... संयम हरवतोय !
केवळ २४ तासांत तीन जीव जाणे, ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नाही, तर ढासळत्या सामाजिक मानसिकतेचे लक्षण आहे. आजच्या तरुणाईमध्ये कमालीचे नैराश्य, चिडचिड आणि तात्कालिक राग वाढला आहे. "आपण रागाच्या भरात जे पाऊल उचलतोय, त्याने कोणाचा तरी संसार उद्ध्वस्त होणार आहे आणि आपलेही आयुष्य जेलच्या अंधारकोठडीत सडणार आहे," याचे भानही तरुणांना राहिलेले नाही.
या विळख्याची प्रमुख कारणे
१. व्यसनाधीनताः अमली पदार्थ आणि दारूच्या नशेत विवेक हखणे.
२. चुकीची संगतः भाईगिरी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचे आकर्षण.
३. बदललेली जीवनशैली: सोशल मीडियावरील हिंसेचे उदात्तीकरण आणि संवादाचा अभाव.