किनवट : किनवट शहरातून दुचाकी चोरुन तिची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.१७) रात्री ११ च्या सुमारास करण्यात आली. या चोरट्याकडून आठ दुचाकींसह महागडा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. सुनील उर्फ बालाजी शत्रू मस्से (वय 24 वर्ष, रा.सावरी,ता.किनवट) असे या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रेल्वेतील खाजगी कर्मचारी गजानन भ्रमाजी चोले यांनी ४ ऑक्टोंबर २०२४ ला किनवट रेल्वे स्टेशन समोर आपली दुचाकी लावली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्यानंतर त्यांनी किनवट पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ही चोरीची दुचाकी सुनील मस्से हा वापरत असल्याची गोपनीय माहिती खबऱ्याद्वारे ‘एलसीबी’ला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला सावरी येथून ताब्यात घेतले. त्याने दुचाकी चोरल्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून सात दुचाकी व एक बुलेट व एक महागडा मोबाईल असा एकूण ३ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत पोलिस निरीक्षक देवीदास चोपडे, पोलीस फौजदार सागर झाडे, स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे पीएसआय साईनाथ पूयड, पोलीस हवालदार सुरेश घुगे, पोलीस अंमलदार विलास कदम, संदीप घोगरे, कदम, बिचकेवार, सहा.पोलीस उपनिरीक्षक अप्पाराव राठोड यांचा सहभाग होता.