Theft rate increases on Pune to Nanded train
उमरी, पुढारी वृत्तसेवा शिक्षण आणि नोकरीच्या दृष्टिकोनातून अतिमहत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या पुणे येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या जास्त आहे. परंतु, पुणे येथून नांदेडकडे आणि नांदेड येथून पुण्याकडे एक्स्प्रेस रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांत चोरीचे प्रमाण वाढले असून प्रवासी भयभीत झाले आहेत. १८ जुलै रोजी नांदेड येथील एका प्रवाशाची रेल्वेतून सँग बॅग कपडे, रोख रक्कम व कागदपत्रांसह चोरीला गेली. या प्रकरणी नांदेड रेल्वे पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
नांदेड येथील आकाश धोंडीबा धानोरकर हे दि. १७ जुलै रोजी पुणे जंक्शन येथून रात्री ९.३५ वाजता (गाडी क्रमांक १७६२९) रेल्वेने कोच एस-चार सीट क्रमांक २८ वरून प्रवास करीत होते. दोन्ही सीट मधील मोकळ्या असलेल्या जागेवर त्यांनी निळ्या रंगाची सँग बॅग ठेवली होती. त्यात आधारकार्ड, पॅनकार्ड, कॉलेजचे ओळखपत्र, रोख तीन हजार रुपये, टायटन घड्याळ, हेडफोन होते. सदर बॅग मनमाड ते छत्रपती संभाजीनगर प्रवासात चोरीला गेली आहे. याप्रकरणी आकाश धानोरकर यांनी नांदेड रेल्वे पोलिसात १८ जुलै रोजी दुपारी तक्रार दिली. त्यावरून नांदेड रेल्वे पोलिसांनी मिसिंग दाखल करून चौकशी सुरू केली.
नांदेड मनमाड, नांदेड पुणे, नांदेड सिकंदराबाद, नांदेड मुंबई या लोहमार्गावर धावणाऱ्या सर्वच रेल्वेच्या आरक्षित डब्यात जनरल प्रवाशांचा मुक्त संचार असतो. दोन महिने अगोदर आरक्षण करूनही सुखाचा प्रवास करता येत नसल्याने, प्रवासी संतप्त होत आहेत. कारण जनरलचे प्रवासी खुलेआम आरक्षित डब्यातून प्रवास करत त्रास देतात. या प्रकाराकडे रेल्वे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आता प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे.
नांदेड ते पुणे आणि पुणे ते नांदेड एक्स्प्रेस रेल्वे गाड्यातून प्रवाशांच्या बॅगा, महिलांची पर्स, मोबाईल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. रात्रीच्या वेळ-`ला रेल्वेत नियुक्त कलेले सुरक्षा रक्षक, पोलिस अधिकारी रेल्वे डब्यात येतच नाहीत. त्यामुळे आरक्षित डब्यातही कोणीही यावे आणि कोणीही बसावे असे प्रकार वाढले आहेत.