रेल्वेत नोकरीचं आमिष...एक कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक File Photo
नांदेड

दिल्‍लीतून आला नोकरीचा साखरपुडा; रेल्‍वेत नोकरीचं आमिष दाखवून नांदेडच्या तरूणाला गंडा

Railway Job Fraud : अनेक तरुणांच्या स्वप्नांचा चक्काचूर, एक कोटी ११ लाखांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

किनवट : पुढारी वृत्तसेवा

"भारतीय रेल्वेत नोकरी लावतो" असे सांगून दिल्लीतील संशयित आरोपींनी किनवट येथील तरूणासह अनेकांना एक कोटींहून अधिक रुपयांनी गंडवले. बनावट ई-मेल, फसवी नियुक्तीपत्रे, खोटे मेडिकल सर्टिफिकेट्स, ओळखपत्रे आणि बनावट प्रशिक्षणाच्या नावाखाली हापुर (उत्तर प्रदेश) येथे पाठवून या टोळीने अनेक तरुणांचे स्वप्नच चक्काचूर केले. या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीतून आला ‘नोकरीचा साखरपुडा’... पण गाठ पडली बनावट दलालांशी

फिर्यादी गजानन बाबू जाधव (वय 25, रा. सुभाष नगर, किनवट) यांच्या तक्रारीनुसार, हरेंद्र भारती व आशिष पांडे (दोघे रा. डीएमआर कार्यालय, न्यू दिल्ली) तसेच रेल्वे विभागाशी संबंधित इतर कर्मचारी यांनी भारतीय रेल्वेतील कमर्शियल क्लर्क पदासाठी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. जागा निश्चित असल्याचे सांगत त्यांनी वेळोवेळी फिर्यादीसह इतर उमेदवारांकडून एकूण 01 कोटी 11 लाख 86 हजार रुपये घेतले.

ई-मेलवर जॉइनिंग, ओळखपत्रही मिळाले... पण हापुरच्या प्लॅटफॉर्मवरच थांबली स्वप्नांची गाडी

संशयित आरोपींनी बनावट नियुक्तीपत्रे, मेडिकल कागदपत्रे आणि ओळखपत्रे देऊन हापुर रेल्वे स्टेशन येथे प्रशिक्षणासाठी पाठवले. तिथे एका व्यक्तीने त्यांची हजेरी घेतली आणि "उद्या पुन्हा या" असे सांगून तब्बल 20 दिवस थांबवले. मात्र या कालावधीत कोणतेही प्रशिक्षण झाले नाही, नियुक्ती तर दूरची गोष्ट. काही दिवसांनी संशयित आरोपींचे फोनही बंद होऊ लागले.

शेवटी फसवणूक स्पष्ट झाली... पोलिसांत धाव घेतली

आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर गजानन यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दिलेल्या अर्जावर चौकशी करून दिनांक 24 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.नि.सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे हे करीत आहेत.

फक्त नोकरी हवी म्हणून दिला सर्वस्वाचा होमविधी...

हा प्रकार म्हणजे युवकांच्या नोकरीच्या अपेक्षा, ग्रामीण भागातील विश्वास आणि शहरातील बनावट नेटवर्क यांचं एक धोकादायक मिश्रण आहे. यासारख्या प्रकरणांमुळे अनेक तरुणांचे शिक्षण, कुटुंबाचे आर्थिक गणित आणि आत्मविश्वास यावर घाला पडतो.

पोलिसांचा तपास सुरू... आणखी फसवलेले तरुण पुढे येणार का?

पोलिसांकडून ही फसवणूक साखळीच्या स्वरूपात असल्याचा संशय असून, इतर जिल्ह्यांतील तरुणही या जाळ्यात सापडले असण्याची शक्यता आहे. पोलीस जनतेला आवाहन करीत आहेत की, अशा प्रलोभनांना बळी न पडता अधिकृत मार्गानेच नोकरीसाठी प्रयत्न करावेत.

थोडा विचार केला असता... ही गाडी कुठे थांबेल....

नोकरीच्या नावे कोटींचा व्यवहार हीच संशयाची ठिणगी होती. पण 'काम खात्रीचं आहे' या वाक्याने अनेक तरुण भुलले. आता उरला आहे तो फसवणुकीचा अनुभव आणि न्यायाची वाट पाहणारा प्रवास.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT