The Kinwat Municipality has been sanctioned funds of Rs 48 crore for a market and commercial complex
किनवट, पुढारी वृतसेवा :
किनवट शहराच्या विकासासाठी दिलासादायक बातमी असून केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत किनवट नगरपालिकेच्या दोन महत्त्वाच्या विकासकामांना शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देत सुमारे ४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने ९ जानेवारी २०२६ रोजी याबाबत अधिकृत शासननिर्णय जारी केला आहे.
या निर्णयानुसार शहरातील जुन्या गुरांच्या बाजाराच्या जागेवर आधुनिक दुकान केंद्र विकसित करण्यासाठी १७ कोटी ११ लाख ३१ हजार रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प विकास आराखड्यानुसार राबविला जाणार असून, यामुळे किनवट शहरातील व्यापारी सुविधा अधिक नियोजनबद्ध स्वरूपात उपलब्ध होणार आहेत.
त्याचप्रमाणे भाजीपाला मार्केट परिसरात व्यापारी संकुल व सुसज्ज भाजीपाला बाजार विकसित करण्यासाठी ३१ कोटी ३१ लाख ९९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी, किरकोळ व्यापारी तसेच ग्राहकांना एकाच ठिकाणी आधुनिक व सोयीस्कर बाजारपेठेची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या दोन्ही प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे आता निविदा प्रक्रिया, कामाचे आदेश व प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कामाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, हे प्रकल्प केंद्र शासनाच्या निधीतून पूर्ण केले जाणार आहेत. या निर्णयामुळे किनवट शहराच्या आर्थिक व नागरी विकासाला चालना मिळणार असून, शहरातील बाजारपेठांचे स्वरूप अधिक नियोजनबद्ध, आधुनिक, स्वच्छ व नागरिकांसाठी सोयीचे होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बाजार व व्यापारी संकुलामुळे व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांना आधुनिक सुविधा मिळणार आहेत. मंजूर प्रकल्प वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यास नगरपालिकेचा प्राधान्यक्रम राहील.- सौ. सुजाता विनोद एंड्रलवार नगराध्यक्षा