The historic Hind-Di-Chadar ceremony was held across 52 acres
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शीख धर्माचे नववे गुरु हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरी एका ऐतिहासिक पर्वाची साक्षीदार होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ५२ एकरांच्या विशाल परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिली.
५२ एकरांवर अध्यात्मिक नगरी
या सोहळ्यासाठी प्रशासनाने ५२ एकर जा-गेवर भव्य मंडप उभारला आहे. भाविकांच्या सोयीसाठी साडेतीनशेहून अधिक स्टॉल्स आणि आरोग्य शिबिरे उभारण्यात येत आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे.
देशभरातून सुमारे ८ ते १० लाख भाविक या सोहळ्यासाठी नांदेडमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. या भाविकांच्या सेवेसाठी ज्या स्वयंसेवी संस्थांना सेवा द्यायची आहे किंवा स्टॉल्स लावायचे आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कर्डिले यांनी केले आहे. प्रशासनातर्फे त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाईल. या ऐतिहासिक सोहळ्यात सर्व नांदेडकरांनी आणि भाविकांनी सहकुटुंब सहभागी होऊन या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.