नांदेडच्या तरुणांतील बंदुकीची वाढती 'क्रेझ' चिंता वाढविणारी! file photo
नांदेड

Gun craze : नांदेडच्या तरुणांतील बंदुकीची वाढती 'क्रेझ' चिंता वाढविणारी!

महिनाभरात ७ पिस्टलसह ७६ जिवंत काडतुसे जप्त

पुढारी वृत्तसेवा

The growing 'craze' for guns among the youth of Nanded is a cause for concern

संतोष जोशी

नांदेड : शिक्षणाची पंढरी अशी ओळख झालेल्या नांदेडची आता ओळख गुन्हेगारी, टोळ्यांसाठी सेफ पॅसेज बनली आहे. तरुणांमध्ये बंदुक, पिस्टलची क्रेझ एवढी वाढली की, नांदेडमध्ये बंदुकीचा वापर सर्रास होऊ लागला आहे. विशेष म्हणजे नांदेडच्या एलसीबी व ग्रामीण पोलिसांनी एका महिन्यात तब्बल ७ पिस्टल, ७६ जिवंत काडतुसे व तीन मॅग्जीन जप्त करत १७ आरोपींना गजाआड केले आहे.

शिक्षणाचे हब बनलेल्या नांदेडला पिस्टल मिळवण्याचे हब. बनायला वेळ लागणार नाही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढती गुन्हेगारी, टोळी युद्ध, वर्चस्वाची लढाई, खंडणी, दरोड्यासाठी पिस्टलचा वापर वाढला आहे.

नांदेड जिल्हा तेलंगणा, कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे. बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशातून अवघ्या १० ते २० हजारांत पिस्टल, बंदूक विक्रीसाठी आणल्या जातात. नांदेडला पिस्टलचे मार्केट चांगलेच जोमात असल्याने मोठ्या प्रमाणावर तरुण गावठी बंदुक, पिस्टल, आधुनिक पिस्टल, जिवंत काडतुसे, मॅग्जीन खरेदी-विक्री करताना आढळत आहेत.

१६ ते २२ वर्षांच्या तरुणांमध्ये बंदुकीचे आकर्षण वाढले असून, त्याचा वापर करण्याचे फॅडही वाढले आहे. झरी, बोंढार, वांगी अशा नादेड शहराच्या आजूबाजूच्या भागात पिस्टल, बंदुकीची डील होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी विशेष मोहीम राबवून बंदुक, पिस्टल ची डील करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

दरम्यान, गेल्या महिनाभरात एलसीबीचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, पोलिस उपनिरीक्षक महेश कोरे आणि पथक, नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने तब्बल पाच ठिकाणी कारवाई करत ७ पिस्टल, ७६ जिवंत काडतुसे, ३ मॅग्जीन तसेच १७ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांची ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे, मात्र तेवढीच नांदेडचे सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारी आणि विचार करायला लावणारी आहे.

पालकांनी सजग होण्याची गरज

आजकाल तरुणांमध्ये मोबाईल मधील रिल्स, इंस्टाग्राम, स्नॅप चॅट तसेच विविध अॅपची भुरळ पाडत आहेत. तसेच व्यसनाधीनताही एक कारण असून, अल्पवयीन मुले, तरुणांमध्ये आपण कोणते गुन्हे करत आहोत हे त्यांना कळत नाही. त्यामुळे पालकांनी अधिक सजग राहून मुलांकडे लक्ष द्यावे व वेळीच आवर घालावा अन्यथा गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेल्या मुलांच्या पालकांना पश्चाताप करण्याची पाळी येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT