नायगाव : गडगा येथील तेली डीपी, महादेव डीपी, जिल्हा परिषद शाळा डीपी, मांजरम रस्ता परिसरातील डीपी अशा एकूण 10 सिंगल फेज डीपी गुरुवारी दि. 8 रोजी जळाल्या. त्यामुळे अनेक दिवसांपासून वीजपुरवठा सतत खंडित होत होता. कमी दाबाचा वीजपुरवठा कसाबसा सुरू असतानाच आता एकाचवेळी सर्व डीपी जळाल्याने अर्धे गाव अंधारात गेले आहे.
गावातील स्विच बॉक्स, केबल, किटकॅट यांची अवस्था अत्यंत दयनीय असून त्याचा थेट परिणाम वीजपुरवठ्यावर होत आहे. मुख्य रस्त्यावरील जुने व जीर्ण लोखंडी खांब कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून संभाव्य अपघाताची भीती नागरिकांत आहे.
विशेष म्हणजे, ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या डीपीचा स्विच बॉक्स अवघ्या तीन फूट उंचीवर असल्याने येथे गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच ठिकाणी अंगणवाडी क्रमांक 4 भरवली जाते, त्यामुळे लहान चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
तसेच गडगा-कंधार रस्त्यावर गावालगत रस्ता क्रॉस करणाऱ्या वीजवाहिन्यांना ऊस वाहतूक करणारे ट्रक व कंटेनर लागत असून हा प्रश्न शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लाकडांच्या सहाय्याने तात्पुरता टेकू देत स्वतःच उपाय केला आहे. हा उपाय तांत्रिकदृष्ट्या अत्यंत धोकादायक असूनही महावितरणने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.