श्रीक्षेत्र माहूर : अचानक आलेल्या पावसात अंगावर वीज कोसळून संजय कृष्णकुमार पांडे (वय 56 रा. करंजी ता. माहूर) हे शिक्षक ठार झाले तर दुसऱ्या एका घटनेत असोली येथे भुईमूगाच्या शेंगा गोळा करीत असताना अमरसिंग रामजी चव्हाण (वय 55 वर्षे) हे शेतमजूर जखमी झाले. या घटना गुरुवारी (दि.15) रोजी दुपारच्या सुमारास घडली.
विदर्भातील हिवरा संगम येथील जि. प. च्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक असलेले संजय पांडे हे करंजी (ता.माहूर) या मुळगावी परत जात असताना माहूर शहरापासून 2 किमी अंतरावर मालवाडा घाटात त्यांच्या अंगावर विज कोसळली. त्यात ते जागीच ठार झाले. दुसऱ्या एका घटनेत असोली येथे शेतात भुईमूगाच्या शेंगा गोळा करीत असताना अमरसिंग चव्हाण (रा. असोली ता. माहूर) यांच्या अंगावर विज कोसळली. त्यात ते गंभीर जखमी झाले. दोघांनाही माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी पांडे यांना मयत घोषित केले.
अमरसिंग चव्हाण यांचेवर वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बिपीन बाभळे, परिचारिका पूजा तरटे, रंजना साबळे, आरती शिंदे, परीचर शेंडे हे उपचार करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पो. नि. शिवप्रकाश मुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक ती कार्यवाही केली. शिक्षक पांडे हे फोन घेत असतानाच त्यांच्यावर विज कोसळली अशी प्रत्यक्षदर्शिनी माहिती प्राप्त आहे.